हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त गौतमी पाटील हेच नाव चर्चेत आहे. गौतमी तिच्या नृत्यामुळे सोशल मीडिया सेलिब्रिटी कधी झाली तेच कळलं नाही. रील सुरु केले कि फक्त आणि फक्त गौतमीच. तिच्या चाहत्यांनी तर सोशल मीडियावरील वातावरण अगदी गौतमीमय करून टाकलं आहे. एकीकडे गौतमीवर आणि तिच्या नृत्यावर टीका केल्या जात आहेत. तर दुसरीकडे राज्यात विविध ठिकाणी गौतमीच्या मोठाल्या सुपाऱ्या सुरूच आहेत.
अश्लील हावभाव करीत नृत्य केल्यामुळे अनेक प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी, नृत्यांगना, तसेच सम्राटांनी गौतमीला खडे बोल सुनावले होते. मात्र गौतमीने माफी मागून हा विषय संपवला. पण तिच्या नृत्य करण्याची पद्धत अजूनही तशीच असल्याचे बोलले जात आहे. ज्यावरून आता प्रिया बेर्डे यांनी तिच्यासह उपस्थित राहून पाहणाऱ्यांचे कान पिळले आहेत.
‘सांगली’ मध्ये एका कार्यक्रमात प्रिया बेर्डे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना गौतमी पाटील यांच्या विषयी विचारलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गौतमी पाटील बाबत बोलताना अभिनेत्री प्रिया बेर्डे म्हणाल्या कि, ‘या सर्व गोष्टीला बघणारे जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे जो पर्यंत आहेत तोवर असे शो बंद होणार नाहीत.
बघणाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याशिवाय या गोष्टी बंद होणार नाहीत. आम्ही आणि राज्यकर्ते यांनी कितीही ओरडून आणि निषेध करून काही होणार नाही’. लोक मोठाळ्या पैशांच्या सुपाऱ्या देऊन त्यांना आणतात. आम्ही काही बोललो की आम्हाला ट्रोल केलं जातं. पण म्हणून आम्ही बोलणं थांबवणार नाही. पण लोकं जोपर्यंत असे कार्यक्रम पाहणं बंद करत नाहीत तोपर्यंत हे सुरुच राहणार’.
प्रिया बेर्डे यांनी आपले मत अगदी परखडपणे व्यक्त केल्यानंतर अनेकांनी त्यांचे समर्थन केले आहे. हा प्रकार थांबवायला विविध भागातून आंदोलने झाली, टीका झाल्या. गौतमी पाटीलने ‘पुन्हा असं होणार नाही’ म्हणत माफी मागितली खरं पण अजूनही तिचा तसाच नाच सुरू असल्याचं लोकांनी संताप व्यक्त केला आहे. अलीकडेच दोन दिवसांपूर्वी तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांनीदेखील गौतमीवर टीका केली होती. लावणीची गौतमी करु नका.. असे ते स्पष्ट बोलले होते. पण कुणीही कितीही ओरडून सांगितल्याने कोणत्या कोपऱ्यात प्रकाश पडेल अशी परिस्थिती आतातरी दिसत नाहीये.
Discussion about this post