हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या रंगभूमीचे दरवाजे चारी बाजूंनी नवं नव्या कलाकारांसाठी उघडे झालेले पाहायला मिळत आहे. आलेल्या प्रत्येक नव्या कलाकृतीला प्रेक्षकांकडून सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ज्यामुळे उदयास येणाऱ्या लेखक, दिग्दर्शक आणि इतर सगळ्याच कलाकारांना प्रोत्साहन आणि कौतुकाची थाप मिळाल्याने दर्जेदार काम करण्याची जिद्द भरीस उतरतेय. रंगभूमीवर होणाऱ्या अशाच सर्जनशील प्रयोगांमध्ये एका नव्या कोऱ्या नाटकाचे नाव सतत कानावर पडत आहे. हे नाटक म्हणजे मधुसंगिता थिएटर्स आणि अर्चना थिएटर्स निर्मित ‘प्रेम करावं पण जपून!’
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं!’ ह्या पाडगावकरांच्या कवितेला अगदी चपखल रित्या न्याय देणारं नाटक म्हणजे ‘प्रेम करावं पण जपून’. प्रेमाचा एका वेगळ्या अंगातून विचार करायला भाग पाडणारे, धावत्या जगात स्तब्ध उभं राहून शांतपणे विचार करायला लावणारे आणि अगदी त्याच क्षणाला खळखळून पोट दुखेपर्यंत हसायला भाग पाडणाऱ्या ह्या नाटकाचे सुवर्ण महोत्सवी प्रयोग सुरू झाले आहेत. या नाटकात मृदुला कुलकर्णी, संकेत शेटगे, भक्ती तारलेकर, विशाल असगणकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
तर नाटकाचे दिग्दर्शन विशाल-दिपेश यांनी केले आहे. लेखन संकेत शेटगे यांचे असून नाटकाबद्दल बोलताना ते म्हणाले कि, ‘प्रेम करावं पण जपून म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर लिव्ह इनच्या जमान्यात शारीरिक आकर्षणाने वाहवत जाणाऱ्या तरुण पिढीला मार्ग दाखवत प्रेमातल्या अत्यंत नाजूक विषयाला समजावून सांगणारे हे नाटक आहे’.
नाटकाच्या निर्मात्या माधुरी तांबे या नाटकाविषयी बोलताना म्हणाल्या की, ‘प्रेम करावं पण जपून..’ ह्या आमच्या नाटकावर प्रेक्षकांनी केलेलं प्रेम पाहता लवकरच नाटकाचा १०० वा प्रयोग सुद्धा प्रेक्षकांच्या उत्तुंग प्रतिसादानेच पार पडेल अशी आशा वाटते आहे.’ तर हे प्रयोग येत्या काळात सवलतीच्या आणि खिशाला परवडेल अशा स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नवखे कलाकार आणि नव्या कोऱ्या टीमला सोबत घेऊन मराठी नाट्यसृष्टीत पाऊल टाकण्याचे स्वप्न पाहणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं हे फार जिद्दीच आणि अवघड काम. परंतु रंगभूमीवर असलेल्या श्रद्धेने आणि रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाने ह्या नाटकाचे ६३ प्रयोग पूर्ण झाले असून पुढचे दोन प्रयोग १३ एप्रिल सातारा आणि ६५वा प्रयोग १५ एप्रिल रोजी कल्याणला आचार्य अत्रे नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
	
					
		
		
		
    
    
    
			
                                    
            
Discussion about this post