हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गुरुवारी १३ एप्रिल रोजी दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांची पहिली जयंती त्यांच्या कुटुंबाने आणि मित्र मंडळींनी एकत्र येत साजरी केली. मृत्यूनंतर अवघ्या महिन्याभरातच हा दिवस आला आणि आपल्या मित्राच्या आठवणीत पुन्हा रममाण होण्यासाठी मंडळी जमा झाली. या निमित्ताने सतीश यांचे जिवलग मित्र अनुपम खेर यांनी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते. शिवाय सतीश यांची पत्नी शशी आणि मुलगी वंशिकाही यावेळी उपस्थित होत्या. या प्रसंगी वंशिकाने आपल्या वडिलांसाठी म्हणजेच सतीश कौशिक यांच्यासाठी एक खास पत्र लिहिलेले वाचून दाखवले आणि क्षणात सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले.
या कार्यक्रमात सतीश यांच्यासोबतचे किस्से, आठवणी, अनुभव सगळ्यांनीच शेअर केले. पण सतीश यांची लेक वंशिका जेव्हा वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली तेव्हा सगळे स्तब्ध झाले. हे पत्र वंशिकाने वडिलांचे पार्थिव जेव्हा घरी आणले होते तेव्हा लिहिले होते. खरंतर हे पत्र वाचणार नाही असे ती म्हणाली होती. पण अनुपम यांनी तिची समजूत घालत वडिलांसाठी व्यक्त होण्याची विनंती केली. अनुपम म्हणाले कि, ‘जेव्हा सतीशला घरी आणलं होतं तेव्हा वंशिकाने मला एक पत्र देऊन सांगितलं, ‘ते उघडू नका, फक्त वडिलांच्या बाजूला ठेवा.’ तू काय लिहिलं होतंस ते आम्हाला कसं कळणार..? तर वंशिका म्हणाली, ‘वेळ आली की हे पत्र वाचेन.’ म्हणून या प्रसंगी अनुपम यांनी वंशिकाला ‘आता योग्य वेळ आली आहे का?’ विचारले असता वंशिकाने मान हलवत हो म्हटले आणि पत्रवाचन केले.
या पत्रात वंशिकाने लिहिलंय, ‘हॅलो बाबा.. मला माहितेय कि, तुम्ही आता आमच्यात नाही. पण मला नेहमीच तुमच्यासोबत रहायचे होते. तुमच्या बर्याच मित्रांनी मला सक्षम राहण्यास सांगितले. परंतु मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. मला तुमची खूप आठवण येते. असे काही होणार आहे हे मला माहीत असते तर मी शाळेत गेले नसते आणि तुमच्यासोबत वेळ घालवला असता. मला तुम्हाला एकदा मिठी मारायची होती. पण आता तुम्ही नाही. चित्रपटांमध्ये जशी जादू दाखवली जाते तशी आताही व्हावी असं वाटतं. जेव्हा आई गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून मला फटकारते तेव्हा मला वाचवायला कोण येईल..? हे आता मला माहीत नाही.
आता मला शाळेत जावंसं वाटत नाही. मित्र- मैत्रिणी काय म्हणतील. प्लीज रोज माझ्या स्वप्नात या बाबा. आम्ही तुमच्यासाठी पूजा ठेवली आहे. पण तुम्ही पुनर्जन्म घेऊ नका. आपण दोघे ९० वर्षांनी पुन्हा भेटू. बाबा मला विसरू नका.. मीपण तुम्हाला कधीच विसरणार नाही. तुम्ही नेहमी माझ्या हृदयात रहाल. जेव्हा मी माझे डोळे बंद करते आणि हृदयावर हात ठेवते तेव्हा मला फक्त तुम्हीच दिसता. तुमचा आत्मा सदैव माझ्या हृदयात असेल. जेव्हा मला मार्गदर्शकाची गरज असेल तेव्हा तुम्ही माझ्यासोबत असाल. माझे वडील हे जगातील सर्वोत्तम वडील होते.’
Discussion about this post