हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वात विविध बायोपिक चित्रपट तयार केले जात असल्याचे पहायला मिळाले आहे. आगामी काळात देखील अनेक महान व्यक्तींचे बायोपिक आपल्या भेटीस येणार आहेत. अशातच आता श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज क्रिकेटपटू मुथैय्या मुरलीधरनच्या आयूष्यावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या बायोपिकच्या घोषणेसह त्याचे पहिले मोशन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे आज मुथैया मुरलीधरनचा ५१ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळालं आहे. या बायोपिक चित्रपटाचे नाव ‘ 800 The Movie ‘ असे असणार आहे. या चित्रपटाची गेल्या बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. पण आता चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर आणि नाव समोर आल्याने चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात मुथय्या मुरलीधरनची भूमिका अभिनेता मधुर मित्तल साकारणार आहे. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि अन्य कलाकारांची माहिती गुलदस्त्यात आहे. ‘स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता मधुर मित्तल या चित्रपटात मुथैया मुरलीधरनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट त्याच्यासाठी खास ठरणार आहे.
या बायोपिक चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन एमएस श्रीपाठी यांनी केले आहे. तर 800 हा बहुभाषिक चित्रपट असून तामिळ, तेलगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या फक्त या चित्रपटाचे नाव आणि मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. मात्र उत्सुकता तुफान वाढली आहे. मुरलीधरनच्या कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम केले आहेत.
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून त्याने १३४७ विकेट घेतल्या आहेत. हा त्याचा विश्वविक्रम आहे. तसेच कसोटीत १३३ सामन्यांत सर्वाधिक ८०० विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३४ बळी घेणारा हा महान क्रिकेटर आहे. त्यामुळे मैदानात मुरलीधरन असेल तर आधीच इतर फलंदाजांच्या पुंग्या टाईट व्हायच्या.
Discussion about this post