हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। व्हायरल व्हिडिओतून प्रकाश झोतात आलेल्या जयेश खरेचा आवाज लाभलेलं ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘गाऊ नको किसना’ हे गाणे चांगलेच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या गाण्यात शाहिरांचे निरागस बालपण दाखवण्यात आले आहे. गाण्याचे बोल, त्याचा ढंग आणि जयेशच्या आवाजाची साद आता साता समुद्रापार पोहोचली आहे. होय. या गाण्याचं क्रेझ आता अमेरिकेपर्यंत पोहोचले आहे. एका मुलीने न्यूयॉर्क सिटीमधील एका रस्त्यावर या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत एक तरुणी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात टाईम स्केवर या ठिकाणी ‘गाऊ नको किसना’ या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. या मुलीचे नाव कृतिका नारकर असे आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. या गाण्याचे संगीत अजय- अतुल यांनी केले आहे आणि या गाण्याला अतिशय श्रवणीय बनवले आहे. या गाण्यामध्ये आपल्याला शाहिरांचं बालपण अनुभवायला मिळत आहे. आईच्या धाकाला घाबरून गाणं कसं सोडणार..? त्यामुळे कोवळ्या वयात दोन्ही बाजू तारणारा किसना या गाण्यातून आपले लक्ष वेधून घेतोय.
सोशल मीडियावर हे गाणं चांगलंच ट्रेंडिंगमध्ये आहे. या गाण्याचे बोल गुरु ठाकूर यांनी रचले आहेत आणि नृत्य दिग्दर्शन हे पॉल मार्शल यांचे आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्स यांची आहे. तर चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे हे आहेत.
या चित्रपटाला अजय आणि अतुल या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचे मंत्रमुग्ध करणारे संगीत लाभले आहे. याशिवाय चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा बहुचर्चित चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. तूर्तास चित्रपटातील गाणी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यास यशस्वी झाली आहेत.
Discussion about this post