हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संतोष जुवेकर हा नेहमीच रावडी नायकाच्या भूमिकेत दिसला आहे. त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे संतोष जुवेकरचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. नेहमीच नायक साकारून मन जिंकणारा संतोष यावेळी नकारात्मक पात्र साकारताना दिसणार आहे. प्रथमच एका ऐतिहासिक चित्रपटात तो नकारात्मक भूमिका साकारणार आहे आणि या भूमिकेविषयी तो फार उत्सुक आहे. या आगामी ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे नाव ‘रावरंभा’ असून यामध्ये संतोष ‘जालिंदर’ हि भूमिका साकारतो आहे.
‘रावरंभा’ चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत बोलताना संतोष म्हणाला की, ‘वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं असतं’. ‘रावरंभा’ च्या निमित्ताने वेगळ्या धाटणीची भूमिका मला करायला मिळाली. निगेटिव्ह शेडची ही भूमिका असून मला स्वतःला ही व्यक्तिरेखा करायला खूप मजा आली. वेगवेगळ्या ऐतिहासिक कलाकृतीतून अशा व्यक्तिरेखांची ओळख होत असते. माझ्या आजवरच्या भूमिकांना रसिकांनी जे प्रेम दिलं. तेच प्रेम ‘जालिंदर’ ला मिळेल असा मला विश्वास आहे.’
अभिनेता संतोष जुवेकरने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ‘जालिंदर’ हि अतिशय वेगळया धाटणीची अशी भूमिका आहे. कपटी स्वभाव अन जनावरांचा दलाल असलेला जालिंदर हा शत्रूंशी संधान बांधून डावपेच करताना या चित्रपटात पहायला मिळणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही एक विलक्षण प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणत आहेत. हा चित्रपट येत्या १२ मे २०२३ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post