हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाह त्याच्या अनोख्या ढंगातील गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तरुणांमध्ये तर बादशहाच्या गाण्यांचं भलतंच क्रेझ पहायला मिळतं. सध्या बादशहाचं ‘सनक’ हे नवीन गाणं चांगलाच ट्रेंडींगमध्ये आहे. जवळपास महिनाभरापूर्वी हे गाणं प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर या गाण्यावरील रिल्सचा कहर पहायला मिळतो आहे. बादशहाच्या चाहत्यांनी तर या गाण्याला आपल्या पसंती दिली आणि डोक्यावर उचलून घेतलं. पण या गाण्यामुळे आता एक नवा वाद उफाळला आहे. उज्जैन येथील महादेवाच्या प्रसिद्ध मंदिराच्या ज्येष्ठ पुजाऱ्यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला आहे.
बादशाहच्या या गाण्यावर मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या एका ज्येष्ठ पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. या गाण्यामध्ये भगवान शिवच्या नावाने आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मंदिराच्या पुजाऱ्यांनी याविषयी बोलताना सांगितलं, ‘बादशाहने गाण्यातून भगवान शिव यांचे नाव काढून टाकावे आणि माफी मागावी. अन्यथा आम्ही बादशाहच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करू’. याशिवाय हिंदू संघटनांसह महाकाल सेना आणि पुजारी महासंघाने या गाण्यातून महादेवाचे नाव तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, ‘बादशाहने या गाण्यात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला असून शिवीगाळदेखील केली आहे. तसेच स्वत:ला शिवभक्त म्हणवून गाण्यात देवाच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे.
आता एकीकडे तरुणाईकडून या गाण्याला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळते आहे. तर दुसरीकडे महादेवांचे भक्त मात्र आपला संताप अन नाराजी व्यक्त करत आहेत. असे असताना पुजाऱ्यांच्या या मागणीबद्दल बादशाह किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. बादशाहचे ‘सनक’ हे २ मिनिटं १५ सेकंदांचे आहे. आतापर्यंत या गाण्याला १९ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यावरील सर्वाधिक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
Discussion about this post