हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाह त्याच्या अनोख्या ढंगातील गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तरुणांमध्ये तर बादशहाच्या गाण्यांचं भलतंच क्रेझ पहायला मिळतं. सध्या बादशहाचं ‘सनक’ हे नवीन गाणं चांगलाच ट्रेंडींगमध्ये आहे. जवळपास महिनाभरापूर्वी हे गाणं प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर या गाण्यावरील रिल्सचा कहर पहायला मिळतो आहे. बादशहाच्या चाहत्यांनी तर या गाण्याला आपल्या पसंती दिली मात्र गाण्यातील ‘भोलेनाथ’ या शब्दामुळे बादशहाविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप या तक्रारीत केला आहे.
इंदूर येथाल ‘परशुराम सेना’ या संघटनेने बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपर बादशाह याच्यावर ‘सनक’ गाण्यात ‘भोलेनाथ’ हा शब्द वापरल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. या कारणामुळे त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. एमजी रोड पोलिस स्टेशनचे प्रभारी संतोष सिंह यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, ‘परशुराम सेना’ या स्थानिक हिंदू संघटनेने बादशाहच्या गाण्याबाबत तक्रार दिली असून चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. या तक्रारीवर अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले.
या संघटनेशी संबंधित वकील विनोद द्विवेदी यांनी बादशाहवर आरोप करत म्हटले आहे कि, ‘सनक’ या गाण्याचे बोल अपशब्दांनी भरलेले आहेत आणि एका ठिकाणी ‘भोलेनाथ’ हा शब्द वापरण्यात आला आहे. बादशाहचे हे गाणे फक्त हिंदू समाजालाच नाही तर संपूर्ण सुसंस्कृत समाजाच्या दृष्टीने आक्षेपार्ह आहे’. एकीकडे तरुणाईकडून या गाण्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळते आहे. तर दुसरीकडे याच गाण्यामुळे आता बादशाह अडचणीत आला आहे. बादशाहचे ‘सनक’ हे गाणे २ मिनिटं १५ सेकंदांचे असून सोशल मीडियावरील ट्रेंडिंग गाण्यांपैकी एक आहे.
Discussion about this post