हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बलुचिस्तानात झालेल्या लढाईत मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला, गुलामगिरी पत्करावी लागली. सळसळतं रक्त मराठ्यांना शांत बसू देत नव्हतं, आपली हार सहजासहजी स्वीकारतील ते मराठे कसले? बलुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीने विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठ्यांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित ‘बलोच’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी भव्य रांगोळी, तुतारी, ढोल ताशाच्या गजरात, मराठमोळ्या, राजेशाही थाटात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर या चित्रपटातील ‘खुळ्या जिवाला आस खुळी’ हे पहिलं प्रेमगीत प्रदर्शित झाले होते. यावरून या चित्रपटात एका मराठ्याचे निरागस प्रेम तर दुसरीकडे बलुचिस्तानचे रोमांचकारी युद्ध अनुभवायला मिळणार आहे. ‘बलोच’चा टिझर अंगावर शहारे आणणारा आहे. चित्रपटातील दमदार संवाद मनाला भिडणारे आहेत. एका मराठी लढवय्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांची ही कहाणी आहे. गुलामगिरी पत्करूनही त्यांनी हार मानली नाही. त्यांचा हा विजय म्हणजे ‘बलोच’. चित्रपटाच्या ट्रेलरवरून चित्रपटाची भव्यता कळतेय.
अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा, पटकथाकार प्रकाश जनार्दन पवार आहेत. तर महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे (डी. के.), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड निर्माते असून पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार हे सहनिर्माते आहेत. प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, रमेश परदेशी, अमोल कागणे, सुरभी भोसले यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या असून हा चित्रपट येत्या ५ मे रोजी ‘बलोच’ प्रदर्शित होणार आहे. ‘बलोच’च्या वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओजच्या अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळली आहे.
Discussion about this post