हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात महाराष्ट्राच्या मातीतील लोककलावंत कृष्णराव गणपतराव साबळे यांची जीवनगाथा पहायला मिळणार आहे आणि यामुळे चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पहायला मिळाली. या चित्रपटात अंकुश चौधरी शाहिरांच्या भूमिकेत तर केदार शिंदे यांची लेक सना षीने शाहिरांची पत्नी अर्थात भानुमती साबळे यांची भूमिका साकारते आहे. याशिवाय ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाशी अभिनेते किरण माने यांचाही जवळचा संबंध आहे. तो काय..? हे जाणून घेऊया.
किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत सांगितले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे कि, ‘…एखादं प्रोजेक्ट तारखांच्या कारणासाठी हातातून गेल्याची चुटपूट लागून रहाते. बिगबाॅस नंतर माझ्याकडे खूप कामे चालून आली याचा आनंद आहेच… आजही, आत्ता ही पोस्ट लिहुन लगेच मी कॅमेर्यापुढेच उभा रहाणार आहे… हे साध्य झालं फक्त त्या शो मुळेच ! पण… याआधी बिगबाॅसच्या आणि शुटिंगच्या तारखा क्लॅश झाल्यानं एक छान सिनेमा सोडावा लागला होता. ‘मुलगी झाली हो’ चं शुटिंग करत होतो. अचानक केदार शिंदेचा फोन आला, “किरण, शाहीर साबळेंवर बायोपिक करतोय. त्यातल्या शाहिरांच्या सातारा वास्तव्यातल्या संवादांमध्ये अस्सल सातारी लहेजा, शब्द, बोली हे सगळं यावं यासाठी मला मदत करशील का? तयार असशील तर प्रतिमाताई, तू आणि मी दादरला जिप्सीमध्ये भेटूया. तुला स्क्रिनप्ले देतो.” मी एका क्षणात होकार दिला. फोन ठेवला आणि मन धावत भूतकाळात गेलं… मायणीत…’
पुढे, ‘…चौथी-पाचवीत होतो. वडिलांनी टेपरेकाॅर्डर आणला. सोबत पाचसहा कॅसेटस् होत्या. त्यातल्या काही होत्या शाहीर साबळेंच्या ! ‘बापाचा बाप’, ‘आबुरावाचं लगीन’ अशी लोकनाट्यं त्यात होती. ती ऐकून याड लागलं. अक्षरश: तोंडपाठ केली ती. चारपाच मित्र जमवले.. त्यांनाही हा नाद लावला. मग काय, दर रविवारी आमच्या घरापुढच्या व्हरांड्याचं स्टेज बनवायचं आणि शाहिरांची लोकनाट्य सादर करायची ! आयुष्यातलं पहिलं ‘स्टेज’ , पहिल्या नाटकातला पहिला अभिनय, पहिला प्रेक्षक, अभिनयाचं पहिलंवहिलं कौतुक…हे सगळं सगळं अनुभवायला शाहीरांची ती लोकनाट्यं कारणीभूत ठरली. अकरावीला काॅलेजसाठी सातार्यात आल्यावर जेव्हा-जेव्हा शाहीरांचा कार्यक्रम सातारला असेल तेव्हा कार्यक्रमाच्या आधीच ते जिथं मुक्कामाला असत तिथं पोहोचायचो. तिथं जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून आशिर्वाद घ्यायचो. लै भारी वाटायचं. मी आजही अभिमानानं सांगतो की, आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ मी शाहीर साबळेंचा घेतलाय !’
आणि शेवटी त्यांनी लिहिलंय की, ‘…’महाराष्ट्र शाहीर’च्या प्रोसेसमध्ये केदारनं काही काळ का होईना सहभागी करून घेणं, हे माझ्यासाठी किती आनंद देणारं असेल, किती मोलाचं असेल हे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. खरंतर केदार मला या सिनेमात एक छान भुमिकाही देणार होता, पण शुटिंगच्या तारखा आणि बिग बाॅस एकाच वेळी आल्यामुळे ती संधी हुकली.पण या निमित्तानं मी ज्यांना गुरूस्थानी मानतो अशा शाहीर साबळेंना सलाम करण्याची छोटीशी का होईना संधी मिळाली. सलाम शाहीर, त्रिवार सलाम !!! – किरण माने’.
Discussion about this post