हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनतेला त्यांचे हक्क मिळून देण्यापासून ते भारताच्या संविधानासारखे मोठे दिव्या पार पडणारे, दलित समाजावरील अन्यायाला वाचा फोडत आपल्या लेखणीतून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणत क्रांती घडवणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वत्र अनुयायी पसरलेले आहेत. आता त्यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय . ज्याचे नाव ‘परिनिर्वाण’ असून यात लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिका साकारणार आहे. मात्र तो साकारत असलेली भूमिका हि आंबेडकरांची नव्हे तर नामदेव व्हटकर यांची आहे. तर कोण आहे नामदेव व्हटकर…? असा सवाल तुमच्याही मनात आलाच असेल ना… चला तर याबाबत काही माहिती घेऊ.
तर ६ डिसेंबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाचा निरोप घेतला. त्या वेळी कोट्यवधींचा जनसागर महामानवाला निरोप देण्यासाठी उसळला असताना असं काहीतरी घडलं जे इतर कुणालाही ठाऊक नाही. मात्र यावेळी त्या दिवसाचे आणि प्रसंगाचे टिपण आपल्या कॅमेरात करणारी ती व्यक्ती होती नामदेव व्हटकर. सुप्रसिद्ध लेखक, संगीतकार, कुशल प्रशासक, लोककलेचे अभ्यासक, प्रगतीशील शेतकरी, स्वातंत्र्य सैनिक, जागरूक आमदार, चित्रपट निर्माते अशा विविध क्षेत्रातून त्यांची विविध ओळख सांगितली जाते. मात्र हा चित्रपट नामदेव व्हटकर यांनी जे त्या दिवशी पाहिलं, कॅमेरांच्या रीळने चित्रित केलं ते आपल्याला पडद्यावर पहायला मिळणार आहे.
या चित्रपटाबद्दल विचारले असता दिग्दर्शक शैलेंद्र बागडे यांनी सांगितले कि, ‘एका चित्रपटाविषयी पुस्तक वाचत असताना मला नामदेव व्हटकर यांचा एका ओळीचा संदर्भ सापडला आणि नंतर त्याविषयी मी शोध घेत गेलो. इंटरनेटवरही फार काही माहिती उपलब्ध नव्हती. मग इथे तिथे शोधून त्यांच्या कुटुबियांचा नंबर मिळवला आणि त्यांना जाऊन भेटलो. त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकांमधून मला बरीच माहिती मिळाली. तिच मांडण्याचा प्रयत्न मी या चित्रपटातून केला आहे. हा चित्रपट माहितीपट अथवा चरित्रपट नसून हा एक व्यावसायिक चित्रपट आहे. यातून दोन व्यक्तिमत्वांचा समांतर प्रवास आम्ही समोर आणतोय. या चित्रपटात १९२५ ते १९५६’चा काळ दाखवण्यात आला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती देणाऱ्या अनेक गोष्टी समोर येणार आहेत’.
Discussion about this post