हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक ओम राऊत याचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर प्रेक्षकांडम्ह्ये सिनेमाबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र सिनेमाचा टिझर, पोस्टर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता पूर्ण लयास गेली. यानंतर सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्या, वाद झाले. इतकेच नव्हे तर मोशन पोस्टरमधील सीता मातेचा कुमारिका लूक पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला होता. अशातच आज सीता मातेच्या लूकचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये सुधारित लूक रिलीज केला आहे.
ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ सिनेमात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत तर अभिनेत्री क्रिती सॅनॉन सीता मातेच्या भूमिकेत दिसते आहे. काही दिवसांपूर्वी ‘आदिपुरुष’ सिनेमाचे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची झलक दाखवणारे मोशन पोस्टर रिलीज झाले होते. या मोशन पोस्टरमध्ये क्रिती सॅनॉन सीतामातेच्या भूमिकेत असूनही अविवाहित लूकमध्ये दिसत आहे. सीतामातेच्या कपाळी कुंकू नसल्याने मोठा वाद झाला होता. पण ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर सीता मातेच्या भूमिकेचे नवे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये सीतेच्या भूमिकेत असलेल्या क्रितीच्या कपाळी टिकली आणि भांगेत कुंकू दिसत आहे.
काहीच दिवसांपूर्वी आलेल्या पोस्टरमुळे जितका मोठा वाद उफाळला होता तो पाहून अखेर ओम राऊतने सीतेच्या भूमिकेत असलेल्या क्रिती सॅनॉनचा लूक सुधारला आहे. त्यामुळे अविवाहीत महिला म्हणून सादर केलेली सीता माता आता विवाहित स्त्रीच्या पूर्ण लूकमध्ये दिसते आहे. चित्रपट निर्मात्यांनी हिंदू देवतांचे लूक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने दाखवून हिंदू धर्माचा अपमान केल्याचे म्हणत तक्रार दाखल करण्यात आली होती. आदिपुरुषच्या मोशन पोस्टरवरुन मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी हिंदू धर्मियाच्या भावना दुखावल्याप्रकरणी कलम २९५ अन्वये २९८, ५००, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
Discussion about this post