हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट केवळ एक कथा नसून एक गाथा आहे. या चित्रपटातून महराष्ट्राच्या मातीतील लोककलावंत शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित बायोपिक सिनेमा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकवर्ग थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहे. दरम्यान केदार शिंदे यांनी आपल्या या विशेष अन खास कलाकृतीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आजोबांसोबत म्हणजेच शाहीर साबळेंसोबत संवाद साधला आहे.
या पोस्टमध्ये आजोबांसोबतचा फोटो शेअर करत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लिहिलं आहे कि, ‘बाबा.. तुम्ही जे आम्हाला दिलं आहे, तुमचे संस्कार, तुमची परंपरा, कलेप्रती असलेली तुमची निष्ठा, सचोटी, एक कलाकार म्हणून कसं जगायचं ह्याचे धडे.. त्या कशाचीच परतफेड आम्ही कधीच करू शकत नाही.. पण तुम्ही आमच्यासाठी उघडुन दिलेल्या ह्या विशालकाय जलाशयातल्या काही घागरी आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी उपसून काढल्या आहेत.. ह्या गढूळ वातावरणात त्या स्वच्छ पाण्याची चव त्यांना भावेल.. त्यांचा आत्मा शांत होईल.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची मनोरंजनाची तहान सुद्धा भागेल..’
पुढे लिहिलंय, ‘हा चित्रपट आम्ही केलेला नाही.. हा तुमचाच चित्रपट आहे.. तुम्हीच घडवून आणला आहे.. आज पासून हा प्रेक्षकांच्या स्वाधीन होतोय.. तुम्ही ह्या महाराष्ट्राला जितकं प्रेम दिलं तितकंच प्रेम हा महाराष्ट्र तुम्हाला देईलच ही खात्री आहे आम्हाला..’. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट खरोखर गाजतो आहे. चित्रपटातील गाणी ज्यांना अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे ती चित्रपटासाठी जमेची बाजू ठरली आहेत. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसतो आहे तर केदार शिंदेंची लेक सना शिंदे शाहिरांच्या पत्नी भानुमती साबळे यांच्या भूमिकेत दिसते आहे.
Discussion about this post