हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून असे नजरेत येत आहे कि, मराठी चित्रपटांचे कथानक, स्टारकास्ट कितीही चांगले असले तरीही थिएटरमध्ये चित्रपट जास्त काळ टिकत नाही. याचे कारण अनेकदा चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला नाही हे नसतेच. तर चित्रपटाला थिएटर मिळत नाही हे कारण असते. ख्वाडा, बबन यासारऱ्या अस्सल गावरान ढंगातील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणल्यानंतर दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी सिनेसृष्टीला ‘TDM’ दिला. पण या चित्रपटाची सपशेल गळचेपी झाल्याने प्रेक्षकांची नाराजी झाली अन कलाकारांचं अवसान गळलं. म्हणूनच आता या चित्रपटाच्या समर्थनार्थ पुण्यातील प्रेक्षकांनी भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.
TDM’चा ट्रेलर आल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरात लागलेले शो हाऊसफुल झाले आणि प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली. असे असूनही या चित्रपटाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रिन न मिळाल्याने नाईलाजास्तव त्याचे प्रदर्शन थांबवावे लागलं. यामुळे दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे आणि चित्रपटातील कलाकार अत्यंत भावुक झाले. यानंतर आता हे प्रकरण आणखीच चिघळलं असून पुण्यात या चित्रपटाच्या समर्थनार्थ ट्रॅक्टरवरून भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. एखादा चित्रपट चालावा म्हणून अशा पद्धतीचा मोर्चा काढणे असे पहिल्यांदाच घडले आहे.
TDM चित्रपटाला शो मिळावे यासाठी शिरूरमधील प्रेक्षकांनी थेट रस्त्यावर उतरून ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. अनेक चित्रपटगृहांनी या चित्रपटाला प्राईम टाईम नाकारल्यामुळे भाऊराव प्रेक्षकांसमोर हात जोडून रडले आणि त्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. पण शिरूरकरांनी मात्र भाऊरावांची साथ देत ‘TDM’च्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून शिरूर बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ट्रॅक्टर मोर्चा काढला. शिरुर परिसरातील गव्हाणेवाडीच्या भाऊराव कऱ्हाडे यांच्या पाठीशी शिरूरकर उभे राहिले. या मोर्चामध्ये हजारो प्रेक्षक सामील झाले होते. या मोर्चात ‘भाऊराव तुम्ही खचु नका आम्ही तुमच्या सोबत आहोत..’ असा नारा देण्यात आला. इतकंच काय तर सोशल मीडियावर आय सपोर्ट TDM चा हॅशटॅगदेखील ट्रेंड होतो आहे.
Discussion about this post