हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अनेकदा ती विविध विषयांवर आपले परखड मत प्रकट करण्यासाठी विविध पोस्ट शेअर करताना दिसते. नाटक, मालिका, चित्रपट अशा माध्यमातून तिने आपल्या अभिनयाची छाप तर आधीच पाडली आहे. पण हेमांगी अनेकदा तिच्या थेट आणि स्पष्ट विधानांमुळेच चर्चेत असते. अशीच एक रोखठोक पोस्ट तिने पुन्हा एकदा शेअर केली आहे आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज तिने कपडे आणि फॅशन या विषयावर पोस्ट शेअर करताना स्वतःचा अनुभव सांगितला. सोबतच पुरुषांना एक सल्लाही दिला आहे.
हेमांगीने हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘जेव्हा तुम्हाला फारसे कपडे खरेदी करावेसे वाटणार नाही तेव्हा तुम्ही समजूतदार झाले आहात असं समजायचं.. हे विधान थोडं विचित्र आहे पण खरंय! मी २०२० आणि २०२१ पुर्ण २ वर्ष कपड्यांचं बिलकुल शॉपिंग केलं नाही. एकतर लॉकडाउन चालू होता, दुसरं म्हणजे त्याच काळात उमगलं की कपड्यांवर खुपच खर्च होतो आणि तिसरं म्हणजे माझ्यात फार मोठे शारीरिक बदल होत नसल्यामुळे कपड्यांचा ढीग साचतोय आणि कपाट कमी पडतंय. माझ्याकडे १५-२० वर्षांपासूनचे कपडे अजूनही चांगल्या condition मध्ये आहेत आणि मी ते वापरते. काही माझ्या भाच्यांना देते. काही mix match करत वापरते. आता इतकी वर्ष हे कपडे टिकतात कसे तर एक म्हणजे कपडे नीट वापरायची, जपून धुवायची शिस्त आणि दुसरं म्हणजे या कला क्षेत्रात काम केल्याच्या अनेक फायद्यांमध्ये शूटिंग सेट, नाटकातले कपडे दिवसभर घातल्यामुळे आमच्या वैयक्तिक कपड्यांचा कमीत कमी वापर’.
पुढे लिहिलंय कि, ‘पण आता तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असलात (खासकरून महीलांसाठी) तरी सोशल मीडिया मुळे एकदा का एका आऊट फिट वर तुम्ही एखादा फोटो पोस्ट केला की झालं परत तो वापरायचा नाही असा एक अलिखित नियम रूढ होतोय. आणि मी या नियमातून स्वतःला मुक्त केलंय. मी कपडे रिपीट करते. त्यावरचे फोटोही पोस्ट करते. बिनधास्त. काही आगाऊ लोकं कमेंट मध्ये त्यांच्या बारीक निरीक्षणाची आणि बेरकी स्वभावाची पावती देतात पण त्याने मला फरक पडत नाही. आता मी ४-५ महीन्यातून एकदा खरेदी करते. खरंच खुप बरं वाटतं. हलकं वाटतं.
या post मधून देशा समोर उभे असलेले प्रॉब्लेम सोल्व होणार नाहीएत किंवा या माझ्या आत्मज्ञानाने तुम्हांला काही एक फायदा होणार नाहीए हे मला माहितीए पण मला शेयर करावंसं वाटलं म्हणून केलं. आता मला ती maturity गाठायची आहे जेव्हा हे असलं काही शेयर करणं ही निरर्थक वाटू लागेल! एवढेच नाही तर पुरुषांसाठी तळटीप म्हणून हेमांगीने लिहिलं, ‘मंडळातील पुरूष सदस्यांनी लगेच आपल्या नात्यातल्या, ओळखीतल्या, घरातल्या, बाहेरच्या, ऑनलाइनच्या, ऑफलाइनच्या स्रियांना ‘शॉपिंग कसं करू नये’ याचं उत्तम उदाहरण म्हणून ही पोस्ट वाचून दाखवू किंवा पाठवू नये अन्यथा तुमचा रविवार खराब होण्याची शक्यता उद्भवेल!’
Discussion about this post