हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय सिनेसृष्टीत ‘तुंबाड’ हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय आणि लक्षवेधी ठरला. या चित्रपटाचे कथानक अत्यंत वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले. त्यामुळे प्रेक्षकांनीही या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला. हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता आणि केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक राही बर्वे यांनी चित्रपटावर घेतलेली मेहनत त्याच्या यशातून स्पष्ट दिसून आली. या कलाकृतीची राही यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. यानंतर आता आणखी एक वेगळी कलाकृती घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘गुलकंद टेल्स’ नावाची त्यांची आगामी वेब सिरीज लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या प्रचंड चर्चेत आहे.
‘तुंबाड’ या चित्रपटाचा सिक्वल यावा यासाठी प्रेक्षकांनी हट्ट धरला होता. मात्र एका मुलाखतीमध्ये बर्वे यांनी स्पष्ट सांगितले की, या चित्रपटाचा सिक्वल येणार नाही. तेव्हापासून राही बर्वे आता पुढे काय, कोणती आणि कधी एखादी कलाकृती घेऊन येतात याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. मध्यंतरी बर्वे ‘मयसभा’ हा चित्रपट घेऊन येणार अशी चर्चा होती. मात्र त्याचे काही खास अपडेट समोर आले नाहीत. अशातच प्राईम व्हिडिओसाठी ‘गुलकंद टेल्स’ ही वेब सिरीज ते घेऊन येत असून सीरिजचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दरम्यान सीरिजच्या शूटिंग सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दिग्दर्शक राही बर्वे यांच्या आगामी वेब सिरीजचे नाव ‘गुलकंद टेल्स’ असे का आहे..? हा प्रश्न निर्माण होत आहे. कारण शीर्षकावरून वेब सिरीजचा विषय नेमका काय असेल..? याचा अंदाज लावणे कठीण आहे. शिवाय शूटिंग सेटवरील व्हायरल झालेला फोटो पाहून प्रेक्षकांना आता सिरीजच्या ट्रेलरचे वेध लागले आहेत. याबाबत बोलताना राही बर्वे म्हणाले आहेत कि, लवकरच सिरीजचा टिझर आणि ट्रेलर येईल. ‘तुंबाड’च्या यशानंतर राही बर्वे यांची ही आगामी कलाकृती प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.
माहितीनुसार या वेबसिरीजमध्ये कुणाल खेमू, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, पत्रलेखा हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ‘गुलकंद टेल्स’ या वेबसीरिजची निर्मिती ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘फर्जी’सारख्या सीरिज देणारे राज आणि डीके यांनी केली आहे.
Discussion about this post