हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच मंगळवारी ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. टिझर रिलीजनंतर ट्रोलिंगचा शिकार झालेला हा सिनेमा ट्रेलर रिलीजनंतर बऱ्यापैकी प्रेक्षकांना भावला आहे. टीझरवेळी केलेल्या चुका यावेळी सुधारून ओम राऊतने हा ट्रेलर प्रदर्शित केला. त्यामुळे प्रेक्षकांनी यावेळी ट्रेलरला चांगला प्रतिसाद दिला आहे. असे असले तरीही ट्रेलरमधील काही सीन्सवर मात्र लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे अभिनेते सुनील लहरी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या ट्रेलरवर नाराजी व्यक्त केली आहे. या ट्रेलरमधील काही दृश्य मॉडर्न स्वरूपात दाखवण्याचा अट्टाहास त्यांना आवडलेला नाही. हे सांगताना एका वृत्त वाहिनीशी त्यांनी संवाद साधला आहे. यावेळी सुनील लहरी म्हणाले कि, ‘ट्रेलर आधीपेक्षा चांगला आहे, पण यातून रामायण अधिक मॉडर्न स्वरूपात सादर केले जाणार असे वाटत आहे. प्रत्येकाचा विचार आणि दृष्टिकोन वेगळा असतो, पण रामायणाच्या बाबतीत लोकांच्या मनात जी भावना आहे तिला धक्का लागता कामा नये’.
पुढे म्हणाले, ‘ट्रेलरमधील काही गोष्टी मला खटकल्या. जसे कि, हनुमानाच्या पाठीवर बसून श्रीराम यांना बाण सोडताना दाखवण्यात आले आहे. मी आजवर जेवढा रामायणाचा अभ्यास केला आहे त्यात असा प्रकार मी कुठेच ऐकलेला किंवा वाचलेला नाही. हनुमंताच्या आग्रहाखातर राम आणि लक्ष्मण हे त्यांच्या खांद्यावर बसतात, पण पाठीवर बसून बाण सोडतात हे माझ्या तरी ऐकिवात नाही. शिवाय वनवासादरम्यान प्रभू श्रीराम पूर्ण कपड्यात दिसत आहेत. पण त्यावेळी त्यांनी केवळ भगवी वस्त्रेच परिधान केल्याचे अभ्यासात आहे’. अशाप्रकारे लहरी यांनी ट्रेलरमधील चुकांवर बोट ठेवत आपली नाराजी व्यक्त केली आहे. माहितीनुसार, ‘आदिपुरुष’ हा चित्रपट येत्या १६ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
Discussion about this post