हॅलो बॉलीवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याची बोंब सुरु आहे. यामुळे काही मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. अलीकडेच ऐतिहासिक मराठी चित्रपट ‘रावरंभा’ची नवी रिलीज डेट समोर आली आहे. यानंतर आता आणखी एका मराठी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे समजत आहे. नव्या अपडेट नुसार १९ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणारा ‘फकाट’ आता येत्या २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समजत आहे. याबाबत माहिती देणारे एक नवे पोस्ट सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.
श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ चित्रपट आता २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये हेमंत ढोमेच्या हातात एक ‘एलओसी सिक्रेट’ची फाईल दिसत असून सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, महेश जाधव, किरण गायकवाड ही फाईल मिळवण्यासाठी खेचाखेची करताना दिसत आहेत. अनुजा साठे आणि रसिका सुनील त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कबीर दुहान सिंग त्या सगळ्यांच्या मागे उभा दिसत असून त्याच्या हातात दोन बंदुका दिसत आहेत. त्यामुळे आता हे ‘एलओसी सिक्रेट’ प्रकरण नेमके काय आहे, याचे सिक्रेट २ जूनलाच उघड होणार आहे. वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मात्या नीता जाधव आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, ‘चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आम्ही बदलली असून २ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा एक धमाल विनोदी, कौटुंबिक चित्रपट असून तो प्रेक्षकांनी पाहावा, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. चित्रपटातील कलाकारही एकदम ‘ ‘फकाट’ आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. चित्रपटगृहातून बाहेर पडताना पैसा वसूल धमाल कॅामेडी, अॅक्शन चित्रपट पाहिल्याचे समाधान प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्कीच असेल’.
Discussion about this post