हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गौतमी पाटील हे नाव सतत सोशल मीडियावर काही ना काही कारणामुळे चर्चेत असत. यावेळी हे नाव पुन्हा एकदा राड्यामुळे चर्चेत आलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमात अनेकदा हुल्लडबाजीचे प्रकार, गर्दीचा लोट आणि अश्लील वर्तनाचे प्रकार आपण ऐकले असते. यावेळी गौतमी नाशिककरांच्या भेटीला पोहोचली होती आणि इथेच तिच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमादरम्यान अल्पगर्दी पहायला मिळाली. याचे वार्तांकन करण्यासाठी पोहोचलेल्या पत्रकाराला काही मद्यपींनी गंभीर स्वरूपाची मारहाण केली आहे.
नाशिकच्या ठक्कर डोम येथे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा मंगळवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवनिर्माण सेवाभावी संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र नाशिकमध्ये प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला जाणे टाळल्याचे दिसून आले. यामागे कार्यक्रमाचे तिकीट दर जास्त असल्याचे सांगितले आहे. ३०० रु ते २ हजार रु.पर्यंतचे तिकीट दर परवडत नसल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. दरम्यान या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली आणि या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले.
या सर्व प्रकारात पत्रकारांना गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. तसेच या घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये याकरता नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमाला गर्दी नव्हती. खुर्च्या रिकाम्याचं होत्या. पण काही प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. आलेल्या प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत चांगलाच गोंधळ घातला आणि यामुळे आयोजकांना कार्यक्रम वेळेआधीच आटोपता घ्यावा लागला.
Discussion about this post