हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड संगीत विश्वातील अत्यंत लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान तिच्या सुरेल आवाजाने नेहमीच रसिकांचं मन जिंकताना दिसते. इंडियन आयडॉल फेम सुनिधी चौहानची गाणी अत्यंत श्रवणीय असतात आणि त्यामुळे आघाडीच्या गायिकांमध्ये सुनिधी चौहान हे नाव घेतले जाते. उद्या २१ मे ‘वर्ल्ड नो टोबॅको डे’निमित्त सुरेल सुनिधीच्या लाईव्ह कॉन्सर्टचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. या कॉन्सर्टच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांसाठी निधी जमा केला जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
गायिका सुनिधी चौहान हि केवळ गायिका म्हणून कार्यरत नाही तर सामाजिक बांधिलकी देखील जपताना दिसते. सुनिधी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे अनेकदा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ती सहभागी होत असते. उद्या २१ मे रोजी ‘वर्ल्ड नो टोबॅको डे’निमित्त ‘कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन’ आणि ‘जागतिक आरोग्य संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुनिधी लाईव्ह म्युझिक फॉर अ कॉज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या लाईव्ह कॉन्सर्ट मधून कॅन्सर रुग्णांसाठी निधीचे संकलन केले जाणार आहे आणि सुनिधी या उपक्रमाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हा लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट उद्या २१ मे रोजी मुंबईतील बांद्रा येथे असणाऱ्या ‘रंगशारदा ऑडिटोरिअम’ या ठिकाणी सायंकाळी ७ वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबद्दल जागृती घडवून आणणे तसेच कर्करोगींच्या मदतीसाठी निधी संकलित करणे अशी उद्दिष्ट साधली जाणार आहेत. या कॉन्सर्टमध्ये सुनिधी ‘से येस टू लाईफ, से नो टू टोबॅको’ या टॅगलाईनचा गजर करत तिची गाजलेली गाणी सादर करणार आहे. या कार्यक्रमाविषयी सुनिधी म्हणाली की, ‘संगीत हा माझ्यासाठी लोकांसोबत जुळण्याचा एक मार्ग आहे. मला आशा आहे की माझ्या कामगिरीमुळे CPAA शी संबंधित लोकांना आनंद आणि आनंद मिळेल. तसेच कॅन्सर रुग्णांना मदत करण्यासाठी मोठा निधी देखील निर्माण होईल. या उदात्त कार्याशी जोडल्याबद्दल मी कृतज्ञ आणि आनंदी आहे’.
Discussion about this post