हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अत्यंत गाजलेली मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून बालकलाकार मायरा वायकुळ प्रेक्षकांच्या भेटीस आली. या छोट्याशा परीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. तिचं बोलणं, तिचा अभिनय आणि तिचा निरागसपणा प्रेक्षकांना प्रचंड भावला. मायराच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झाले आणि यानंतर लवकरच ती आणखी एका हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचे नाव ‘नीरजा – एक नई पहचान’ असे आहे. या मालिकेचा प्रोमो अलीकडेच रिलीज झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मराठी मालिकेनंतर पहिल्यांदाच मायरा हिंदी मालिकेमध्ये काम करताना दिसणार आहे. ‘नीरजा- एक नई पहचान’ या तिच्या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये बंगाली वेशभूषा, पारंपरिक दागिने परिधान केलेल्या मायराची पहिली झलक दिसली. यामध्ये नीरजा म्हणजेच मायरा कालीमातेची आरती करताना एक व्यक्ती तिच्यावर नजर ठेवत असल्याचं तिच्या लक्षात येतं. यावेळी ती बंगालीमध्ये एक ते दहा अंक म्हणते आणि त्यानंतर तिथून पळ काढते. घरी तिला एक बाई भेटते जी तिला का पळतेय असं विचारते.
यावर ती म्हणते कि, ‘माझ्या आईने मला सांगितलं आहे की, दहा अंक पूर्ण होईपर्यंत जर एखादी व्यक्ती आपल्याकडे बघत असेल तर तिथून पळून जायचं.” त्यावर ती बाई म्हणते, ‘आमची नीरजा आहेच इतकी सुंदर कि लोक तिच्याकडे बघणारच’. इतक्यात तिची आई तिथे येते आणि तिला घेऊन जाते. इतकेच नव्हे तर आपल्या मुलीला आपल्या नाइलाजामुळे कुठल्याही कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागू नये म्हणून ती नीरजाचे केस कापते’.
आता या सुंदर जगात तिला सुंदर दिसण्याचे स्वातंत्र्य का नाही..? हे जाणून घेण्यासाठी मालिका पहावी लागेल. ही नवी मालिका ‘कलर्स टीव्ही’वर सुरू होणार असून यामध्ये मुख्य भूमिकेत बालकलाकार मायरा वायकुळसह अभिनेत्री स्नेहा वाघ आणि काम्या पंजाबी देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.
Discussion about this post