हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल या आजही मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. अजूनही तेच स्मितहास्य आणि तोच गोडवा प्रेक्षकांना त्यांच्या वारंवार प्रेमात पाडत असतो. विविध मालिका, चित्रपट आणि रिऍलिटी शोच्या माध्यमातून आजही त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. त्यामुळे आजही त्यांची चर्चा असतेच. दरम्यान अलका कुबल या नुकत्याच पुण्याच्या येरवडा तुरुंगात आपल्या लेकीसह गेल्या होत्या. त्यामागे एक खास कारण आहे आणि तेच कारण जाणून घेऊया.
अभिनेत्री अलका कुबल या थोरली लेक ईशानीसोबत येरवडा तुरुंगात गेल्या होत्या. गुरूवारी दिनांक २५ मे २०२३ रोजी पुण्यातील भोई प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या संकल्पनेतून महिला कैद्यांकरता सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अलका कुबल यांची प्रमुख उपस्थिती होती. म्हणूनच त्यांनी आपल्या लेकीसह पुण्यातील येरवडा महिला कारागृहाला भेट दिली होती. यावेळी अलका कुबल यांनी कारागृहातील महिलांशी संवाद साधला.
यावेळी अलका कुबल यांनी महिला कैद्यांना महिला सबलीकरणबाबत मार्गदर्शन केले. इतकेच नव्हे तर, महिलांनी खचून न जाता जिद्दीने संकटांचा सामना करून परत नव्याने आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात करावी, याबाबतही मार्गदर्शन केले. महिलांना मानसिक आधार देत सर्व बंदी महिला आणि महिला अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांशी त्यांनी मोकळा सुसंवाद साधला. अलका कुबल यांच्या उपस्थितीने येरवडा जेलमधील महिला कैद्यांना दैनंदिन आयुष्यातून एक वेगळा दिवस अनुभवण्याची संधी मिळाली.
Discussion about this post