हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत यात काही वाद नाहीच. पण अभिनयाइतकेच ते थेट, निर्भीड, परखड आणि बेधडक स्वभावासाठी सर्व स्तरावर अधिक ओळखले जातात. ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजमध्ये त्यांनी मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारली आहे आणि त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी चित्रपट क्षेत्रातील अनुभवावर भाष्य केले आहे. इतकेच नव्हे तर फारसी शब्द मराठी म्हणून कसे प्रचलित झाले याचेही स्पष्टीकरण दिले आहे.
अभिनेते नासिरुद्दीन शाह यांनी ‘Tried and refused productions’ या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांच्या उर्दू भाषेवरील प्रेमाचाही उल्लेख निघाला आणि मग त्यांनी उर्दू ही भाषा कशी तयार झाली याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले कि, ‘उर्दू भाषा ही भारतातील वेगवेगळ्या भाषांपासून अस्तित्वात आली आहे. तर मराठी भाषेतील अनेक शब्द हे फारसी भाषेतून आलेले आहेत’. याबाबत विविध उदाहरणे देत नसीरुद्दीन शाह यांनी म्हणणे मांडले आहे.
अभिनेते नसीरुद्दीन शाह म्हणाले कि, ‘बऱ्याच मराठी भाषिकांना हे माहित नाही कि या भाषेत बरेच फारसी शब्द वापरलेले आहेत. ज्यांचा दैनंदिन जीवनात सर्रास वापर केला जातो. आता ‘आरसा’ हा फारसी शब्द आहे. तर ‘जकातनाका’मधील ‘जकात’ हासुद्धा फारसी शब्द आहे. ‘फकत’मधून तयार झाला ‘फक्त’ हा शब्दसुद्धा फारसी शब्द आहे. असे मराठी भाषेत अनेक शब्द आहेत जे पारशी आहेत आणि आज मराठी भाषेचा भाग झाले आहेत. मात्र त्यांचं मूळ हे फारसीचं आहे. त्या काळात फारसी भाषा ही सामान्य लोकदेखील बोलत असत. इतकंच काय तर, छत्रपती शिवाजी महाराज यांनाही फारसी भाषा अवगत होती’. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा नसीरुद्दीन शाह चर्चेत आले आहेत.
Discussion about this post