हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०’व्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रवी जाधव यांच्या ‘बाल शिवाजी’ चित्रपटाच्या घोषणेसह पहिले मोशन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर दिसला. सैराट चित्रपटातून प्रकाश झोतात आलेल्या आकाशच्या पदरी शिवरायांची भूमिका पडणे हि निश्चितच त्याच्यासाठी जबाबदारीची बाब आहे. आकाशला शिवरायांच्या भूमिकेत पाहून या चित्रपटाबाबत प्रत्येकाची उत्सुकता ताणली आहे. या पोस्टरवर सैराटची आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूनेदेखील कमेंट केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कपाळी चंद्रकोर, गळ्यात कवड्याच्या माळा, चेहऱ्यावर जखमा, हातात तलवार आणि भेदक नजर असा आकाश ठोसरचा शिवरायांच्या भूमिकेत पहिला लूक पाहून सोशल मीडियावर नुसता कहर झाला आहे. त्याचा हा लूक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. हे पोस्टर आकाशने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पाया भरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर’.
आकाशने हे पोस्टर शेअर करताच नेटकरी आणि सिने विश्वातील तारे त्याला या आव्हानात्मक भूमिकेसाठी शुभेच्छा देताना दिसले. त्याच्या या पोस्टवर चित्रपटाचे दिग्दर्शक रवि जाधव यांनी ‘जय शिवराय’ अशी कमेंट केली आहे. तर आकाशची अत्यंत जवळची मैत्रीण आणि प्रेक्षकांची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूने या पोस्टरवर कमेंट करताना ‘अभिनंदन’ म्हटले आहे. यावर रिप्लाय करत आकाशने ‘थँक यु’ म्हटले आहे. याशिवाय रितेश देशमुख, अमृता खानविलकर, सायली पाटील, हार्दिक जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक, दीप्ती देवी, अक्षय वाघमारे, शिव ठाकरे, प्रथमेश परब आणि अशा अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आकाशला या भूमिकेसाठी भरभरून शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे.
Discussion about this post