हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ रिलीज व्हायला अगदी काहीच दिवस राहिले आहेत. येत्या १६ जून २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. असे असताना चित्रपटाची संपूर्ण टीम ठिकठिकाणी प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. अलीकडेच चित्रपटाचा अंतिम ट्रेलर रिलीज करण्यासाठी तिरुपतीत प्री रिलीज इव्हेन्टसाठी संपूर्ण टीम पोहोचली होती. यावेळी सर्व कलाकारांनी आवर्जून तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले.
#Adipurush: Controversies continue to haunt the Team! While such a send-off gesture is quite common amongst the celebrities, it was inappropriate at the Tirumala. #KrithiSanon #OmRaut pic.twitter.com/hkUd2ButLG
— AndhraBoxOffice.Com (@AndhraBoxOffice) June 7, 2023
दरम्यान मंदिरातून बाहेर पडले असताना ओम आणि क्रिती यांनी एकमेकांना मिठी मारली आणि गुड बाय किस दिले. यावरून सोशल मीडियावरील तापमान पेटले आहे. अशातच आता ‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेत्री क्रिती सॅनॉनच्या मंदिर परिसरातील या कृतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरु झालं. शिवाय मंदिराच्या पुजाऱ्यांनी देखील त्यांना खडे बोल सुनावले. अशातच आता रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेमध्ये माता सीतेची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर आणखीच विविध चर्चांना उधाण आले आहे.
दीपिका चिखलिया यांनी स्वतः सीतेची भूमिका साकारली होती आणि त्यामुळे स्वतःचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की, ‘मी माझ्याबद्दल आणि आमच्या त्या काळाबद्दल बोलले तर त्या वेळी सेटवर आम्हाला आमच्या नावाने हाक मारण्याचं धाडस कोणी केले नाही. मला चांगलं आठवतंय की आम्ही आमच्या भूमिकेत असताना अनेकदा लोक येऊन आमच्या पाया पडत असत. तो काळ वेगळा होता. आम्ही कुणालाही मिठी मारू शकत नव्हतो, किसींग तर लांबच आहे.
आजच्या कलाकारांनी हे समजून घ्यायला हवं की जेव्हा आपण अशा प्रकारच्या भूमिका करतो तेव्हा लोक आपल्याला देव मानतात. क्रिती ही आजच्या पिढीची अभिनेत्री आहे. आजच्या युगात कोणाचे चुंबन घेणे किंवा मिठी मारणे हा एक गोड हावभाव मानला जातो. तिने स्वतःला कधीच सीताजी मानले नसेल. तो भावनांचा विषय आहे. मी सीतेचे पात्र जगले आहे तर आजची अभिनेत्री त्याला फक्त भूमिका मानतात. चित्रपट किंवा प्रोजेक्ट संपल्यानंतर त्यांना आता काही फरक पडत नाही’.
Discussion about this post