हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या अवघा महाराष्ट्र विठू नामाच्या गजरात न्हाहून गेला आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविक, वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघाले आहेत. वारी केवळ प्रथा नाही तर वारी हि एक भावना आहे. रात्रंदिवस टाळ- मृदुंगाच्या तालावर तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन आणि संतांची पालखी नाचवत भक्तिरसात तल्लीन झालेले हे वारकरी ऊन, पाऊस वाऱ्याची तमा न बाळगता अनवाणी विठुरायाच्या भेटीची असं घेऊन आनंदे चालत असतात. या निमित्ताने ‘विठ्ठल माझा सोबती’ हा चित्रपट भाविकांच्या भेटीस येतो आहे आहे.
फक्त मराठी आणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विठ्ठल माझा सोबती’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या २३ जून २०२३ रोजी सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तुकाराम गाथे मधील या अभंगाचा साक्षात्कार या चित्रपटातून घडवला जाणार आहे. हा चित्रपट पांडुरंगाच्या एका निस्सीम भक्तावर आणि त्याच्या जीवनावर आधारित आहे. एका श्रीमंत कुटुंबात जिथे पैसा आहे पण नात्यांची किंमत नाही. अशातच जेव्हा कुटुंब कलहाला कंटाळलेल्या त्या भक्ताच्या आयुष्यात ‘विठ्ठल’ नामक मदतनीस येतो. तो कोण आहे..? तो कुठून आणि का आला ..? यांच्या उत्तरांमध्येच सारं काही दडलं आहे.
पल्लवी मळेकर (फक्त मराठी) निर्मित आणि संदीप मनोहर नवरे दिग्दर्शित ‘विठ्ठल माझा सोबती’ हा चित्रपट एक अध्यात्मिक कौटुंबिक चित्रपट आहे. या चित्रपटात अरुण नलावडे, संदीप पाठक, राजेंद्र शिरसाटकर, आशय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, दिव्या पुगांवकर, अभय राणे या आणि अशा अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा संदीप मनोहर नवरे यांची आहे. तर पटकथा, संवाद विक्रम एडके यांचे आहेत. गौरव चाटी आणि गणेश सुर्वे यांचं संगीत आहे.
Discussion about this post