हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच सोहळा अगदी दणक्यात पार पडला. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित होती. ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अर्थात अशोक मामांचाही समावेश होता. यावेळी अशोक मामांनी माध्यमांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला. दरम्यान अशोक मामांना चित्रपटात काम न करण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर अगदी स्पष्ट शब्दांत त्यांनी उत्तर देणे पसंत केले. ‘चित्रपटापेक्षा नाटक खूप काही देऊन जात’, असे म्हणताना अशोक मामांनी चित्रपटात काम न करण्याचे मुख्य कारण सांगितले.
यावेळी अशोक सराफ म्हणाले कि, ‘सध्या मी चित्रपट करत नाही. कारण मला कुणी लिहून देत नाहीये. लेखकच नाहीये कुणी. लोक मला कॉमेडियन म्हणून ओळखतात. सगळ्यांच्या नजरेत मी फक्त कॉमेडियन आहे. मी इतर भूमिका करू शकतो का हे माहित नाही अजून किंवा मी वेगळ्या भूमिका करु शकतो याची त्यांना खात्री वाटत नाही. त्यामुळे कुणीही मला इतर भूमिकांसाठी विचारत नाही. फक्त कॉमेडियन म्हणूनच माझा विचार केला जातो. आता माझ्या वयाची आणि माझ्या स्टाइलची कॉमेडी लिहिणारा कुणी लेखक आहे कोण आहे? माझ्या स्टाइलची कथा लिहिणारा कुणी लेखक नाही याची मला मोठी खंत वाटते. कॉमेडी होत का नाही..? करत का नाही..? कारण कुणी लिहीत नाही आणि जे लिहितात, करतात त्याला कॉमेडी म्हणायचं म्हणजे आपण स्वतःला फसवण्यासारखं आहे. त्यामुळे मी काही करत नाही. माझ्याकडे स्क्रिप्ट येतात. पण मी वाचतो आणि बाजूला ठेवून देतो. त्यांना नाही म्हणून सांगतो. नाही जमणार.. कारण मला ते करावसं वाटत नाही’.
‘मला जर एखादी स्क्रिप्ट वाचून काम करावं वाटलं तरच मी करणार. मला वाटलं कि यात मी काहीतरी वेगळं करू शकेन तरचं मी करेन. आपण काय करू शकतो हे ठरवता यायला पाहिजे आणि मला ज्या स्क्रिप्टमध्ये आपण काय करू शकतो हे ठरवता येत नाही तिथे मी काम करत नाही. पण जर कोणी खरंच मला चांगली स्क्रिप्ट आणून दिली तर मी काम करेन. पण केवळ कॉमेडी म्हणून मला घ्यायचं ठरवलं तर ते माझ्याने होणार नाही. कारण कुणी माझ्या वयाची कॉमेडी लिहू शकणार नाही. माझ्या वयाची कॉमेडी लिहिणं शक्य नाही. माझ्या वयात कॉमेडी होत नाही असा बहुदा त्यांचा समज असावा.
मला आता हिरो, हिरोचा मित्र असे रोल मिळणार नाहीत. तर मला आता बापाचे रोल मिळणार आणि कुठला बाप कॉमेडी असतो? एक वेळ होती की, ज्यामध्ये वडील कॉमेडी दाखवायचे. पण आता तसं घडत नाही. मुळातच तसं लिहिणारं कोणी नाही. त्यामुळे काही होऊ शकत नाही. हे माझ्या बाबतीत आहे. त्यापेक्षा मला नाटक करणं चांगलं वाटत. माझं एक नाटक चालू आहे ज्याचे पावणे चारशे प्रयोग झाले. रंगभूमी तुम्हाला फारचं काही देऊन जाते. चित्रपटामध्ये एकदा कॅमेरे बंद झाले कि तुम्ही बंद झालात. मग तुम्ही कितीही बदलू म्हटलं तरी तसं होत नाही. पण रंगभूमीवर तुम्हाला सुधारण्याची संधी असते’.
Discussion about this post