कल्लाकार कट्टा | यंदाच्या झी गौरव पुरस्कारात हटके स्टोरी आणि ग्रामीण बाज असलेल्या आटपाडी नाईट्स या चित्रपटाने बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या सहा पुरस्कारांसह “आटपाडी नाईट्स” या चित्रपटाने यंदाच्या “झी गौरव पुरस्कार 2020” वर आपली मोहर उमटवली आहे.
दिग्दर्शक नितीन सुपेकर यांच्याशी चित्रपटाच्या एकूण प्रवासाबद्दल चर्चा केली असता त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील वाटचालीशी चित्रपट जोडून दाखवला. ते म्हणाले, “19 वर्षापुर्वी मी लेखन चालु केलं होतं. खूप संघर्ष केला आणि त्यानंतर आज इतक्या मोठ्या कालखंडानंतर माझ्या लिखाणाचं चीज झालं. आटपाडी नाईट्स या चित्रपटाने चाहतावर्ग आणि यश दोन्ही मिळवून दिलं. आटपाडी नाईट्सच्या यशाने खरंच खुप आनंद दिला आहे. कष्टाचा एक मोठा कालखंड यानिमित्ताने अनुभवता आला. 2015 ला या कथेचे लेखन चालू केले पण निर्मात्याशिवाय याचे काम पुढे जाणे अशक्य होते. त्यामुळे बरेच दिवस ही फिल्म थांबली होती. शेवटी सुपेकर दाम्पत्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. घर गहाण ठेऊन चित्रपटनिर्मिती करण्याचा. त्यांनी हे धाडसी पाऊल उचललं. काम चालु केलं. पुढे त्यांची ही धडपड पाहुन त्यांचे मित्र गजानन शिंदे, अमर परदेशी, विनोद राजे यांनी पुढाकार घेत सुपेकर दाम्पत्यांना मदतीचा हातभार लावला. या सर्व कष्टातुन व घेतलेल्या धाडसी निर्णयातुन हा चित्रपट पुर्ण झाला.
चित्रपट सृष्टीतल्या १९ वर्षांच्या कालखंडानंतर, 2015 ला काम चालु केलेल्या आटपाडी नाईट्स चित्रपटाला भरघोस यश मिळालं. प्रामाणिक कष्टाचा आणि राखलेल्या संयमाचा परतावा आज झी गौरवच्या चौदा नॉमिनेशन्ससह सहा पुरस्कारांच्या रुपात मिळतोय ही सुपेकर दाम्पत्य व आटपाडीच्या संपूर्ण टिमसाठी खरच आनंदाची, समाधानाची आणि जल्लोषाची बाब आहे हे सांगण्यासही नितीन सुपेकर विसरले नाहीत.
यातल्या गाण्यांनीही महाराष्ट्रात आणि सोशल मिडियात प्रचंड धुमाकुळ घातला. यातली गाणी आजही अनेकांच्या ओठांवर आहेत. टिकटॉकवर प्रेमाचा झांगडगुत्ता या गाण्याचे सातशेहून अधिक व्हिडिओ झालेले आहेत. हे ही दखल घेण्याजोगं आहे. नितीन सुपेकर यांनी अनेक चित्रपटांच्या कथा–पटकथा लिहल्या आहेत. तब्बल चाळीस छोट्या मोठ्या एनिमेटेड फिल्मसाठीही त्यांनी लेखन केलं आहे. भैरु पहलवान की जय, वेलडन भल्ल्या, चिनु, बेलगाम, भय, बेभान, बडे अब्बु, ब्लँकेट, इलु इलु, आणि आगामी मुषक या चित्रपटांसाठी त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे. यातल्या ‘बडे अब्बु’ या फिल्मसाठी झारखंड नॅशनल फिल्म्सचा उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे.
“आटपाडी नाईट्स” साठी सर्वोत्कृष्ट कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन हे चारही पुरस्कार नितीन सुपेकर यांना मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सायली संजीव हिला मिळाला आहे.
अरुण जोशी यांच्या मायदेश फिल्म्स या बॅनरखाली अभिनेते सुबोध भावे यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात मुख्य भुमिकेत प्रणव रावराने, सायली संजीव, छाया कदम, जतीन इनामदार आहेत. यांसोबतच संजय कुलकर्णी, आरती वडबलकर, समीर खांडेकर, विठ्ठल काळे, योगेश इरटकर यांच्याही भुमिका आहेत.
बालकलाकार म्हणुन ओम ठाकुर याची भुमिका आहे. पाहुणे कलाकार म्हणुन अभिनेते, दिग्दर्शक सुबोध भावे, विवेक राजेश आणि डॉ. सुधार निकम यांच्या भूमिका आहेत.
सिनेमॅटोग्राफर म्हणुन नागराज व वीरधवल पाटील यांंनी बाजु सांभाळली आहे. एडिटिंग निलेश गावंड यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन–विजय गावंडे, सिद्धार्थ धुकाटे यांचे आहे. तर गीतलेखन नारायण पुरी यांचे आहे. सहा पुरस्कारांसह, चौदा नॉमिनेशन मिळवलेल्या आटपाडी नाईट्सवर चित्रपटसृष्टी आणि सोशल मिडियातुन कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तसेच या चित्रपटाच्या टीमनेही सर्व रसिकप्रेक्षकांचे मन:पुर्वक आभार मानले आहेत.
लहान असताना मुंबईत महेश कोठारेंचे धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला हे चित्रपट चुलत्यांना विनवणी करुन पाहिल्याची आठवण नितीन सुपेकरांनी सांगितली. त्यावेळच्या ढिशुम ढिशुमचे नायक महेश कोठारेंच्या हस्ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार स्वीकारताना नितीन सुपेकर भारावून गेले. मनोरंजन क्षेत्रातील १९ वर्षाच्या प्रवासानंतर चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी सुपेकरांच्या पत्नी भावूक झाल्या होत्या. चित्रपटाला पुरस्काररुपी यश मिळाल्यानंतर मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. याचसाठी केला होता अट्टहास अशीच भावना सुपेकर दाम्पत्याच्या चेहऱ्यावर या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळाली.
– विकी पिसाळ
9762511636
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’