हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिग्गज गायक एसपी बालासुब्रमण्यम यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. या संदर्भात जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देखील लिहिले आहे.
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, ‘आपल्या अद्वितीय प्रतिभेने एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांनी त्यांच्या कलाकृतींना उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने भारतातील चाहत्यांनाच नव्हे, तर जगभरातील मोठ्या कलाकारांना दुःख झाले आहे. त्यांच्या जाण्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत क्षेत्राचीही हानी झाली आहे.
जगनमोहन रेड्डी पुढे म्हणाले, ‘लता मंगेशकर, भूपेन हजारिका, एमएस सुब्बलक्ष्मी, उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. संगीत क्षेत्रातील बहुमुल्य योगदानाबद्दल महान गायक एसपी बालासुब्रमण्यम यांनाही भारतरत्न देऊन सन्मानित करावे, अशी विनंती.’
कमल हसन यांचाही पाठिंबा-
आंध्र प्रदेश मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींच्या या मागणीला अभिनेता कमल हसन यांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे. मुख्यमंत्री रेड्डींनी पंतप्रधानांना पाठविलेल्या विनंतीपत्राची प्रत ट्विटरद्वारे शेअर करत कमल हसन यांनी लिहिले की,‘आमचे बंधू एसपी बालासुब्रमण्यम यांना जो सन्मान मिळावा अशी तुमची इच्छा आहे, तीच इच्छा त्यांच्या चाहत्यांची देखील आहे. केवळ तामिळनाडूच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील चाहत्यांची हीच इच्छा आहे.’
एसपी बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची बाधा झाल्याने 5 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दीड महिन्यापासून उपचार सुरु होते. या उपचारा दरम्यान, शुक्रवारी (29 सप्टेंबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’