हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चित्रपटगृहे, थिएटर बंद करण्यात आली आहेत. यामुळे अनेक चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताना दिसत आहेत. आता बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेने थिएटर आणि परफॉर्मिंग आर्टसाठी एक नवा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांसमोर सादर केला आहे. या प्लॅटफॉर्मचे नाव ‘नाइन रसा’ असे आहे. या व्यासपीठावर प्रेक्षक पूर्ण लांबीची नाटके, लहान नाटके, नृत्य, कविता, कथा वाचन, माहितीपट अशा अनेक कलांचा आनंद घेऊ शकतील. या व्यासपीठावर उपलब्ध साहित्य हे हिंदी, मराठी, गुजराती, इंग्रजी या चार भाषांमध्ये असणार आहे. पुढे जाऊन बंगाली, मल्याळम, राजस्थानी, हरियाणवी यांसारख्या इतर भारतीय भाषांमधील कंटेंट इथे पहायला मिळणार आहेत.
आजपासून हा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म ‘नाइन रसा’ विषयी बोलताना श्रेयस तळपदे म्हणाला, ‘मी नाइन रसाबद्दल खूप उत्सुक आहे. मला वाटते की हा जगातील पहिला ओटीटी व्यासपीठ असेल जो केवळ आणि फक्त नाट्य आणि परफॉर्मिंग आर्टसाठी समर्पित आहे. इथे आपल्याला सर्व स्टेज परफॉरमेंस पहायला मिळतील.’ जसे एखादे नाटक स्टेजवर सादर केले जाते तसेच ते इथे दिसणार आहे. शुटींगसाठी मल्टी कॅमेर्याचा वापर केला जातो.
कोरोनामुळे प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊ शकत नाहीत, पण श्रेयाने सादर केलेल्या या प्लॅटफॉर्ममूळे थिएटरच प्रत्येकाच्या घरात येऊन पोहोचले आहेत. मुख्य म्हणजे श्रेयस तळपदेने थिएटर विश्वातील लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने हा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. लॉकडाऊन दरम्यान, श्रेयस तळपदेने तंत्रज्ञ, अभिनेते आणि लेखक इत्यादींसाठी १५०० हून अधिक रोजगार या व्यासपीठाद्वारे उपलब्ध करून दिले आहेत. याचे ‘नाइन रसा’ हे नाव ‘नऊ रस’ यावरून आले आहे, ज्याचा अर्थ नऊ भावना असा होतो. या प्लॅटफॉर्मसाठी, आधीच शूट केलेली नाटके घेण्याऐवजी श्रेयसच्या टीमने तब्बल १०० तासांचा नवा कंटेंट शूट केला आहे.
Discussion about this post