हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच अव्वल असणारी ‘रंग माझा वेगळा’ हि मालिका शीर्षकाप्रमाणे अनोखे आणि विविध रंग बदलणारे ट्विस्ट घेऊन येत असते. अलीकडेच या मालिकेने काही वर्ष पुढे उडी घेतली आणि आता या मालिकेत सूडाच्या भावनेने बदललेले रंग जीवघेणे ठरताना दिसणार आहेत. तब्बल १४ वर्षांची शिक्षा भोगून कार्तिक तुरुंगाबाहेर आला. पण त्याच्या मनात लागलेली आग काही विझली नाही. आपल्याला दीपामुळे तुरुंगात जावे लागले याबाबतची त्याची सूडबुद्धी आता दीपाला या आगीत होरपळून टाकणार आहे. अलीकडेच रिलीज झालेला प्रोमो पाहून कार्तिक आता काय डाव खेळणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
तुरुंगातून जाऊन आल्यानंतर कार्तिकचे बदलले रंग आता प्रखर दिसू लागले आहेत. कार्तिकला दीपाचा बदला घ्यायचा आहे आणि म्हणून तो तिला शक्य तितका त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे. याची सुरुवात त्याने केली असून त्याचा हा डाव दीपाच्या जीवावर बेतणार असे दिसत आहे. कार्तिकने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली आणि त्याच्या आतील सौम्य माणसाचा जणू मृत्यूचं झाला. आता जो कार्तिक दिसतोय तो केवळ सूडाच्या आगीत धगधगणारा आहे. दीपाने बदला घेण्यासाठी मुद्दाम हा डाव रचला आणि आपल्याला तुरुंगात पाठवलं असा त्याचा समज झाला आहे. त्यामुळे हि सूड भावना आता आणखी किती वाढेल याची काहीच शाश्वती नाही.
कार्तिकचं बदललेलं रूप सगळ्यांनाच पहायला मिळत आहे आणि हे रूप प्रेक्षकांसाठीदेखील एक धक्काच आहे. हि मालिका सध्या अशा वळणावर येऊन ठेपली आहे जिथून नेमकं पुढं काय घडणार याची कुणीच कल्पना करू शकत नाही. मालिकेच्या येत्या भागात दीपाला अज्ञात फोन येतो आणि एक धमकी दिली जाते. इनामदारांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचे ती व्यक्ती दीपाला सांगते आणि यामुळे हॉस्पिटलमध्ये गदारोळ माजतो. सगळे हॉस्पिटलबाहेर येतात. मात्र, एक लहान मुलगा हॉस्पिटलमध्येच राहिल्याने दीपा पुन्हा हॉस्पिटलच्या आत जाते आणि यावेळी बॉम्ब वजन काट्यात लावल्याचे तिच्या लक्षात येते. त्यामुळे बॉम्ब फुटू नये म्हणून दीपा स्वतः त्या वजन काट्यावर उभी राहते. आता या प्रसंगातून दीपा वाचणार कि… काय होणार हे पाहण्यासाठी मालिकेचे पुढील भाग जरूर पहा.
Discussion about this post