हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच ‘हर हर महादेव’ हा ऐतिहासिक चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटावर तमाम मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. या चित्रपटात महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत सुबोध भावे तर बाजीप्रभूंच्या करारी भूमिकेत शरद केळकर दिसले. त्यांनी साकारलेल्या भूमिका पाहून प्रेक्षकही भारावले.
आजतागायत अनेक कलाकारांनी शिवरायांच्या भूमिका साकारल्या. कारण शिवरायांच्या चरित्रातील एक एक प्रसंग अंगात ऊर्जा आणि नसानसात सकारात्मकता संचारायला मदत करतो. असेच एका व्यक्तीसोबतही झाले आहे. आत्महत्या करण्याचा नकारात्मक विचार त्याच्या मनी वसला होता. मात्र शिवरायांचे अंतिम दर्शन करण्यासाठी त्याने चित्रपट पाहिला आणि त्याच्या मनात जगण्याची एक आशा निर्माण झाली. त्याने लिहिलेलं पत्र हे सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.
मराठी अभिनेता सुबोध भावे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या पत्राचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे कि, ‘आज दि. 25.10.2022 रोजी हा माझ्या आयुष्यातील खुप महत्वाचा दिवस आहे. मी एक सिव्हिल इंजिनिअर आहे. मी माझ्या वैयक्तिक आयुष्याला कंटाळून आत्महत्या करणार होतो. परंतू एक मुव्हीचा ट्रेलर पाहुन वाटलं कि एकदा ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांना पाहुन डोळे मिटावे. हा मुव्ही पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वप्न काय होत.. किती संकट आले तरी आपले धेय्य पूर्ण करायचे. महाराणी सईबाई आणि महाराज यामधील तो क्षण माझ्या आयुष्यातील मला महत्वाचा वाटतो. म्हणून यापुढे मी कधीच आयुष्यात खचून जाणार नाही आणि आत्महत्या मुळीच करणार नाही.’
हे पत्र या व्यक्तीने अभिजित देशपांडे यांना लिहिले आहे. पत्राच्या शेवटी सुबोध भावे, शरद केळकर, सायली संजीव आणि अभिजित देशपांडे यांचे आभारदेखील त्याने मानले आहेत. या पत्राच्या फोटोसोबत सुबोध यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘शिवछत्रपती यांचे चरित्र नेहमीच सर्वांच्या जगण्याची प्रेरणा आहे. या पत्रावरून ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुम्हाला उत्तम आयुष्य जगायची ऊर्जा देवो याच सदिच्छा!!!!’ सुबोध भावेंची हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊन चर्चेत आली आहे. या पोस्टवर अनेक चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
Discussion about this post