हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या विद्याताई पटवर्धन यांनी मराठी मनोरंजन विश्वाला लाभलेले अनेक कलाकार स्वतः घडवले आहेत. त्यांनी रंगभूमीसाठी केलेले काम वाखाडण्याजोगे आहे. बालरंगभूमीवर त्यांनी विशेष योगदान दिले आहे. अशा ज्येष्ठ रंगकर्मी विद्या ताई सध्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील झाली आहे. त्यांना किमो थेरपी देण्यात येत असताना या दरम्यान त्यांना आणखी काही आजार जडले आणि त्यांची प्रकृती अधिकच खालवली आहे. चालणे- बोलणे, हालचाल करणे त्यांच्यासाठी अवघड झाले आहे.
विद्या ताईंवर उपचार सुरू असून त्यांचे विद्यार्थी अभिनेते नीलेश दिवेकर आणि इतर काही विद्यार्थी कलाकार त्यांची काळजी घेत आहेत. मात्र औषधे, उपचार, राहण्याची व्यवस्था यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. यामुळे विद्याताईंच्या शिष्यांनी ‘अद्वैत थिएटर’च्या मदतीने ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित केला आहे. जो १९ मार्च २०२३ रोजी दुपारी ४ वाजता मुंबईतील शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे. या प्रयोगातून मिळणारा निधी हा विद्या ताईंना वैद्यकीय मदतीसाठी दिला जाणार आहे. याबाबत बोलताना नाट्य निर्माते राहुल भंडारे म्हणाले, ‘आजवर रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि प्रतिसाद या बालनाट्याला मिळाला. अशाच बाल रंगभूमीवर विशेष योगदान देणाऱ्या बालमोहन विदयामंदिर शाळेच्या विद्याताई पटवर्धन. ज्यांच्या माध्यमातून या मनोरंजन क्षेत्राला अनेक नामवंत कलाकार मिळाले’.
पुढे म्हणाले, ‘विद्याताईंनी आपलं संपूर्ण आयुष्य बाल नाट्यासाठी अर्पण केलं. आज त्या एकट्या एका दुर्धर आजाराशी लढत आहेत. आम्ही त्यांचे सर्व विद्यार्थी त्यांच्या सोबत निश्चितपणे उभे आहोतच. पण त्यांच्या उपचारांत एक आधार म्हणून आमच्या सोबत “अलबत्या गलबत्या”ची संपूर्ण टिम एकत्रितपणे या माध्यमातून छोटी मदत करू इच्छिते. तरी या मदतीला हातभार लावण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती. आपल्या विद्याताईंसाठी आपण जास्तीत जास्त तिकिटे घेऊन त्यांच्यासाठी एक चांगला निधी निश्चितच उभारू शकतो’, असे म्हणत त्यांनी प्रेक्षकांना आवाहनदेखील केले आहे.
Discussion about this post