हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोल्हापूरातील पन्हाळगडावर महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. या दरम्यान एक अतिशय मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करत असताना एक तरुण 19 वर्षीय कलाकार किल्ले पन्हाळगडावरील सज्जा कोठीवरून थेट 100 फूट दरीत पडल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी १८ मार्च रोजी, संध्याकाळी साधारण पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
आगामी मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचे किल्ले पन्हाळगडावर गेल्या काही दिवसांपासून चित्रीकरण सुरु आहे. यामध्ये एका मावळ्यांच्या भूमिकेत हा तरुण करत करत होता. या तरुणाचे नाव नागेश खोबरे असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, पन्हाळगडावर चित्रीकरण करण्यासाठी तिथे घोडे आणण्यात आले होते. ज्यांची देखरेख नागेश करत होता. या दरम्यान, नागेश फोनवर बोलता बोलता सज्जा कोटीच्या उत्तर बाजूच्या तटबंदीवरून खाली जात होता. यावेळी अचानक त्याचा तोल आणि पाय घसरून तो थेट १०० फूट खोल दरीत कोसळला.
येथे उपस्थित लोकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच नागेशच्या मदतीसाठी दोर टाकला आणि खाली उतरून त्याला वर काढले. या अपघातात नागेशच्या डोक्याला आणि छातीला गंभीर जखमा झाल्या असून कोल्हापूर येथील सी. पी. आर. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र नागेशची प्रकृती गंभीर असल्याचे पाहता त्याला एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सादर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पन्हाळा पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, या संपूर्ण घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असून विविध कथा रचल्या जात असल्याचेच सांगण्यात येत आहे. कुणी त्याचा पाय घसरल्याचे सांगतय, तर कुणी तो फोटो काढायला गेलेला आणि तोल जाऊन पडला असे सांगत आहे. सध्या पोलीस या घटनेची पूर्ण माहिती घेत आहेत.
Discussion about this post