हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान लाखो तरुणींचा क्रश आणि करोडो तरुणांसाठी लव्हगुरू आहे. तसे पाहता इंडस्ट्रीतील अनेक हिरोंनी प्रेक्षकांना प्रेम करणे शिकवले. पण शाहरूखसारखे प्रेम व्यक्त करणे मात्र बाकी किसी के बस का नहीं! ९० च्या दशकात तर शाहरुखने रुपेरी पडदा नुसता गाजवला नाही तर तरुणाईला प्रेमाचे धडे सुद्धा दिले. आजपर्यंत शाहरूखचा पडद्यावरचा रोमान्स पाहुन आताचीही तरूणाई त्याच्या प्रेमात पडतेय. पण नुकताच एका तरुणीने, शाहरुखने तिचे आयुष्य उध्वस्त केल्याचा आरोप केला आहे.
आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. एका जोडप्याची गोष्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. ह्युमन्स ऑफ बॉम्बे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गोष्ट शेअर केली आहे. ही तरूणी शाहरूखची खूप मोठी फॅन आहे. शाहरूख सिनेमात हिरोईनवर प्रेम करतो, अगदी तसाच आपल्यालाही एखादा ‘शाहरूख’ भेटावा. त्यानेही आपल्याला गुडघ्यावर बसून रोमॅन्टिक अंदाजात प्रपोज करावे, अशी तिची इच्छा होती… पण खऱ्या खुऱ्या आयुष्यात तसे काहीही झाले नाही. हीच गोष्ट या तरूणीने सांगितली आहे. तिच्या पोस्टमधील पहिलेच वाक्य शाहरूखने माझे आयुष्य उध्वस्त केले, असे हे आहे आणि या वाक्याने नुसता धुमाकूळ घातला.
तीने लिहिले आहे कि, शाहरुख खानने माझे आयुष्य उध्वस्त केल़े़…लहानपणापासून शाहरुखचे चित्रपट पाहून ख-या आयुष्यातही कोणी तरी शाहरुखसारखे प्रपोज करावे असे स्वप्न मी दिवसरात्र बघत होते. बॅकग्राऊंडमध्ये व्हायलिन वाजत आहेत, तो माझ्याकडे हळूहळू चालत येत आहे, तो गुडघ्यावर बसेल आणि त्याच्या हातातील अंगठी मला घालेल. पण असे कधी झालेच नाही… खरं तर आम्ही खूप मोठ्या अडचणीत सापडलो होतो. मी माझ्या बंगाली कुटुंबीयांना मला पंजाबी मुलाशी लग्न करायचे आहे यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही तीन वर्षे एकमेकांना डेट करत होतो. पण त्यातला बराच वेळ हा दोघांच्या पालकांना एकत्र आणण्यात गेला. आम्ही ठरवले होते काहीही झाले तरी आपण लग्न करायचे. त्यामुळे त्याने मला सरप्राइज देऊन कधीच प्रपोज करण्याचा प्रयत्न केला नाही. मला हवा असलेला तो फिल्मी क्षण कधीच माझ्या आयुष्यात येणार नसल्याचे मला कळले होते. मग मीच एक सरप्राईज पार्टी अरेंज केली.
पुढे म्हणाली, आम्ही पहिल्यांदा डेटसाठी ज्या हॉटेलमध्ये भेटलो होतो तेथेच ती अरेंज केली होती. तो जेव्हा आत आला तेव्हा ‘मॅरी मी’ हे गाणे लावण्यास सांगितले आणि मी गुडघ्यावर बसले. तू माझ्याशी लग्न करशील का? असे त्याला विचारले़ त्याने माझ्याकडे पाहिले, हसला आणि त्याने मला मस्तपैकी मिठीत घेतले. आपली मुलं इतकी फिल्मी होऊ नयेत, म्हणजे मिळवले, असे तो मला हसत हसत म्हणाला. तो एक सुंदर क्षण होता.मला ज्या फिल्मी क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण मी स्वत:च माझ्या आयुष्यात आणला. प्रत्येकवेळी पुरूषानेच पुढाकार घ्यावा, याची वाट महिला का पाहतात? हा नवा काळ आहे. तुम्हाला तो आवडत असेल तर तुम्ही त्याला प्रपोज का करत नाही? अशी तिने स्वतःची स्टोरी शेअर केली आहे.
Discussion about this post