हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन हे आजही त्यांचा हटके अंदाज आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. अजूनही विविध चित्रपटांच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या भेटीस येत असतात. मात्र गेल्या काही दिवसापासून बिग बींची तब्येत त्यांना साथ देईना झाली आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरण्यादरम्यान त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते लवकर बरे व्हावे म्हणून चाहते दररोज प्रार्थना करत असताना आता एका नव्या अपडेटने चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘काही दिवसांपूर्वी ”प्रोजेक्ट के” या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे विश्रांती घेत कामापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. यामुळे अमिताभ बच्चन हे विश्रांती घेत आहेत. मात्र तरीसुद्धा अमिताभ यांची प्रकृती ठीक होण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चाहते आता आणखीच चिंता व्यक्त करू लागले आहेत.
अमिताभ यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. यात त्यांनी म्हटले होते कि, ‘मी सध्या विश्रांती घेत आहे. लवकरच पूर्णपणे बरा होईन’. अमिताभ बच्चन यांच्या एका निकटवर्तीयांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बींना लवकरच पुन्हा शूटींग सुरु करण्याची इच्छा आहे. पण वयामुळे त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे. त्यांची प्रकृती ठिक होण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो’. आगामी काळात अमिताभ बच्चन बच्चन आपल्याला ‘गणपत’, ‘घूमर’, ‘द उमेश क्रॉनिकल्स’ आणि ‘बटरफ्लाय’ या चित्रपटांमधून विविध भूमिका साकारताना दिसणार आहेत.
Discussion about this post