हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सिने इंडस्ट्रीमध्ये मनोरंजन हा पार्ट वगळता कधी राजकारण तर कधी समाजकारण देखील केले जाते. कधी कोण्या अभिनेत्याला न सांगता त्याची मालिकेतून हकालपट्टी केली जाते. तर कधी कलाकारांना योग्य वेळी त्यांचे मानधन मिळत नाही. इतकेच काय तर.. किरकोळ बाबींवरून वाद झाला म्हणून थेट मालिका बंद करून कलाकारांच्या पोटावर पाय दिला जातो. असे अनेक प्रश्न इंडस्ट्रीमध्ये घोळत आहेत. मात्र यावर बोलणे कुणीही पसंत करत नाही. कुणाला काम जाण्याची भीती असते तर कुणाला काम न मिळण्याची. पण काही कलाकार मात्र अशा विषयांवर रोखठोक बोलणे पसंत करतात. साहजिकच यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण मनातील खदखद व्यक्त केल्याचे समाधान त्यांना याहून अधिक प्रिय असते. असाच एक अव्यक्त मुद्दा मराठी अभिनेता गिरीश परदेशी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला आहे.
अभिनेता गिरीश परदेशी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया फेसबुक हँडलवर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘मराठी मालिकांमध्ये कलाकारांना मिळणारे मानधन हा एक काळजीचा विषय बनला आहे. अनेक जुने कलाकार मित्र माझ्याकडे सध्या पर डे अत्यंत कमी झाला आहे असे दुःख व्यक्त करतात. इतकी वर्ष काम करून वास्तविक आम्हास जास्त पर डे मिळायला हवा हे अत्यंत योग्य आहे. पण लगेच दुसरा कलाकार (नवीन किंवा जुना) कमी पर डेमध्ये काम करायला तयार असतो. यामुळेच एकुणच स्केल खाली उतरला आहे. कलेचे, कामाचे, कष्टांचे पैसे मिळतात कि, इनसिक्युरिटीचे..? हा प्रश्न आहे. प्रोडक्शन नेहमीच बारगेन करत राहणार! पण एकुणच यांवर काही करता येऊ शकेल का..? इंडस्ट्रियलाजेशन व्हावे व त्याची नियमावली असावी.. अनेक मुद्दे आहेत.’
याविषयी हॅलो बॉलीवूडने अभिनेता गिरीश परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देत आपली खंत व्यक्त केली आहे. गिरीश म्हणाले कि, माझे अनेक मित्र मला सांगत आहेत कि, गिरीश.. अरे पर डे कमी झाला आहे. स्केल कमी झाला आहे. मी पैसे जास्त मागितले, अमुक अमुक पर डे मागितला तर दुसरा कलाकार कमी पर डेमध्ये करायला तयार असतो.’ माझं यावर म्हणणं आहे कि, प्रोडक्शन तर बारगेन करणारच. पण मूळ मुद्दा असा कि, कलाकार असं कसं काय करतात…? यामुळेच पे स्केल खाली आला आहे. यामध्ये मी नव्या किंवा जुन्या कलाकारांविषयी बोलतचं नाही, कारण नवीन कलाकार सुरुवात आहे म्हणून कमी पैश्यात काम करतो. तर दुसरीकडे जुना कलाकार काय म्हणतो कि, जाऊदे एव्हढे तर एव्हढे नाहीतर हे सुद्धा काम जाईल हातातून. यात एकामुळे दहा जणांचं पे स्केल खाली आलं आहे.’
पुढे म्हणाले कि, ‘साधारण ८ ते १० वर्षांपूर्वी मी मालिका करत होतो. यानुसार अनुभवी सिनिअर कलाकारांचा पर डे जास्त असायलाच हवा. पण शेवटी सगळ्यांना कमी पर डेमध्ये काम करावं लागत. कारण दुसरा कलाकार कमी पर डेमध्ये काम करायला तयारच असतो. हि परिस्थिती अत्यंत घातक आहे. यामुळे अनेक सिनिअर कलाकार सध्या अवघड परिस्थितीतून जात आहेत. अनुभवानुसार पर डे मिळत नाही आणि यामुळे स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंगची घसरण होते आहे. शिवाय संपूर्ण कलाकार कम्युनिटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. म्हणूनच याबाबत इंडस्ट्रियलाजेशन व्हायला हवे असेही गिरीश म्हणाले. एक नियमावली असायला पाहिजे. म्हणजे ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड असे अनुभवानुसार कलाकार ठरायला हवेत.. असं साऊथ मध्ये होतं. शिवाय असे मुद्दे एका दुकट्याने काढून बोलण्यापेक्षा इतर कलाकारांनीदेखील एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत आहे.
गिरीश परदेशी यांनी मांडलेल्या मुद्द्यावर सोशल मीडिया सक्रिय झाला आहे. या पोस्टवर अनेक लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी गिरीश यांचे समर्थन करत आहे तर कुणी इतर प्रश्न उपस्थित करत आहेत. याशिवाय इंडस्ट्रीतील अनेक लोक आता व्यक्त होऊ पाहत आहेत. यावर अमोल देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, ‘Collective मोठं होण्याची मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे…. आपण सगळे मोठं होणं सर्वच अर्थाने खूप आवश्यक आहे….’ हा मुद्दा एकंदरच मनोरंजन सृष्टीतील धगधगता विषय आहे. त्यामुळे आता यावर इंडस्ट्रीतून कोणत्या प्रकारचा मतप्रवाह वाहतो हे पाहणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
Discussion about this post