हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही अभिनेता किरण माने बिग बॉस मराठी सीजन चारमध्ये सहभागी झाल्यानंतर अधिकच चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर व्यक्त होणे हा जणू मानेंचा छंद. त्यात यांची लेखणी इतकी धारदार कि थेट काळजाला भिडते. किरण माने यांची आपल्या मायभाषेतला गोडवा पुरेपूर वापरून लिहिलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते. किरण माने मूळ साताऱ्याचे. त्यामुळे सातारी भाषा आणि हुरडा पार्टीचं वर्णन म्हणजे दुग्ध शर्करा योग जणू.. नुकतीच किरण माने यांनी आपल्या सासुरवाडीत हुरडा पार्टी एन्जॉय केली आणि याचा अनुभव त्यांनी काही शब्दांत व्यक्त केला आहे.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘आपल्यावर जीवापाड माया करनार्या गनगोतांचा मेळा जमवून हुरडा पार्टी करन्यात जी मजा हाय ना, ती फाईव्ह स्टार हाटीलातल्या पार्टीतबी नाय भावांनो… शेतातल्या ज्वारीची ताटं काढून आनायची. कनसं बाजूला करायची. जमिनीत एक बारका खड्डा खनून त्यात शेनाच्या गवर्या पेटवायच्या… त्या इस्तवावर कनसं भाजायची… भाजल्याव ती हाताव घिवून चोळून कनसाचं दानं बाजूला काडल्याव मिळतो त्यो ‘हुरडा’ ! आन् हो, शेतात राबनार्या हातानंच ती चोळावी बरं का… अशा या हुरड्याची चव म्हंजी आहाहाहा.. जन्नत वो जन्नत. नादखुळा’.
‘परवा सासूरवाडीला – धामणेरला कृष्णेकाठी शेतात अशीच आमची हुरडा पार्टी रंगली. दरवर्षी ह्यो बेत असतोच. ह्यावेळी माझ्या शुटिंगच्या धावपळीमुळं सारखं कॅन्सल होत होत शेवटी परवा पार पडला. मी बी सासर्यांबरोबर, मेहुणे आणि साडूंबरोबर बसून कणसं भाजली, चोळली, हुरडा खाल्ला. हुरड्याबरुबर तोंडी लावायला शेंगदान्याची-लसनाची चटनी होती.. उकडलेल्या शेंगा.. वल्लं कवळं खोबरं होतं… जोडीला अस्सल घट्ट दह्याची वाटीबी होती. या सगळ्यावर मनसोक्त ताव मारत आम्हा पै-पावन्यांचा गप्पांचा फड अस्सा रंगला… गांवाकडच्या इरसाल नमुन्यांचे, ग्रामपंचायतींच्या राजकारनाचे एकसो एक भन्नाट किस्से ऐकून हसून हसून पुरेवाट झाली’.
‘हे जे निसर्गाच्या, आपल्या मानसांच्या गोतावळ्याच्या सहवासातलं अस्सल जगनं हाय ना माझ्या भावांनो… ते आपल्या लेकरांनी अनुभवावं असं हल्ली लै मनापास्नं वाटतं…इतर अनेक गोष्टींसारखं पुढच्या काळात हे बी हरवून जाईल का काय? अशी भिती वाटती… हल्ली शहरात र्हानारी आमची सगळी लहान पोरंपोरी उड्या मारत रानातनं पळत होती…धडपडत ढेकळं तुडवत होती.. वडाच्या पारंब्यांना लोंबकळत होती… गुराख्यांबरोबर शेरडं हाकत चालत होती… ते बघून लै लै लै समाधान वाटलं. मी खर्या अर्थानं रमतो ते अशा ठिकानी. तुकोबारायांच्या शब्दांत सांगायचं तर “आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी॥’ – किरण माने.
Discussion about this post