हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत मोठे नाव महेश कोठारे यांचे पितृछत्र हरपल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण कोठारे कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. महेश यांचे वडील आणि ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते, नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंबर कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी जेनमा, पुत्र महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे.
अंबर कोठारे यांनी अनेक दर्जेदार कलाकृतींची निर्मिती केली होती. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण अतिशय कष्टात आणि बेताच्या आर्थिक परिस्थितीत गेले. ज्यामुळे अंबर कोठारे यांना वेगवेगळी कामे करावी लागली. दिवाळीत गिरगावात रस्त्यावर उटणे विकण्याचे कामदेखील त्यांनी केले.
पुढे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘ब्रिटिश बॅंक ऑफ दि मिडल इस्ट’ या बॅंकेत नोकरी केली. चार दशके त्यांनी या बॅंकेत विविध पदांवर काम पाहिले. नोकरी सांभाळत त्यांनी रंगभूमीची आवड जोपासली आणि प्रायोगिक रंगभूमीवर काम केले.
‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेच्या मराठी विभागाचे ते प्रथम सचिव होते. त्यांनी काही नाटकांमध्ये अभिनय केला होता. त्यापैकी ‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती. अंबर कोठारे यांनी उत्तम नाट्यनिर्मितीचं नव्हे तर चितपट निर्मिती देखील केली आहे. अंबर कोठारे यांनी पुत्र महेश यांना उत्तम कलाकार ते निर्माता आणि दिग्दर्शक होण्याच्या प्रवासात मोलाचे मार्गदर्शन केले.
महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडावा यासाठी वडील म्हणून अंबर कोठारे यांनी अतोनात कष्ट घेतले. महेश यांच्या अनेक कलाकृतींचा ते भाग राहिले आहेत. ‘दे दणादण’ या चित्रपटामध्ये अंबर कोठारे यांनी साकारलेला खलनायकदेखील त्यांनी ताकतीने साकारला होता.
Discussion about this post