हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गो. ब. देवल स्मृतीदिन आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच पद्मश्री परशुराम खुणे यांचादेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.
हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, अभिनेते मोहन जोशी, खासदार राहुल शेवाळे, परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, विश्वस्त गिरीश गांधी, शशी प्रभू, भाऊसाहेब भोईर, नरेश गडेकर, सतीश लोटके, अशोक हांडे, कार्यवाह अजित भुरे, सहकार्यवाह सुनील ढगे, विजय चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. या भव्य सोहळ्यात वामन पंडित संपादित ‘रंगवाचा’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते मोहन जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करत म्हटले कि, ‘मी सगळ्या कलावंतांचा ऋणी आहे. तुमच्याकडून मला शिकायला मिळाले. बॅक स्टेज कलाकार यांचीही मला मदत मिळाली. रसिक प्रेक्षक, माझे कुटुंबियांच्या मदतीमुळे मला कार्य करता आले’.
याशिवाय अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करत म्हटले कि, ‘ही रंगभूमी अशीच चालू राहू दे.. मला अजून खूप नाटके करायची आहेत’.
Discussion about this post