हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रसाद ओक त्याच्या विविधांगी गुणांमुळे या वर्षभरात वारंवार चर्चेत राहिला. हे वर्ष २०२२ जणू प्रसादसाठी सुवर्ण वर्ष होते. याच वर्षात त्याने दिग्दर्शित केलेला विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट हिट ठरला. यानंतर प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर’देखील याच प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे मन जिंकले आहे. शिवाय या वर्षात लेखक म्हणूनसुद्धा प्रसादने पहिलं पाऊल टाकलं. विविध माध्यमातून यशाचे शिखर गाठण्याची, विविध पुरस्कारांवर आपले नाव कोरण्याची संधी देणाऱ्या २०२२ ला आपण कधीच विसरू शकत नाही असे म्हणणारी एक पोस्ट त्याने शेअर केली आहे.
अगदी काही तासांतच २०२२ या वर्षाची सांगता होऊन २०२३ हे नवे वर्ष उजाडणार आहे. या धर्तीवर प्रसादने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये प्रसाद ओक याने लिहिले आहे कि, ‘प्रिय 2022…तू मला भरभरून दिलंस…!!! मी तुला कधीही विसरू शकणार नाही… माझ्या आयुष्यात कायमच तू “सोनेरी वर्ष” म्हणून राहशील…!!! काळजी घे… आणि तुझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद 2023 कडे अलगद पोहोचव आणि त्याला सांग माझ्यावरचं प्रेम आणि आशीर्वाद तुझ्यासारखं कायम ठेव म्हणावं…!!! प्रिय 2023 तुझं अत्यंत मनःपूर्वक स्वागत सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण कर आणि सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेव रे मित्रा…!!!’ अशा शब्दात त्यानेआपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या संपूर्ण वर्षभराने अनेकांना अनेक गोष्टी दिल्या. तशाच अनेक गोष्टी प्रसाद ओकला देखील या वर्षाने दिल्या आहेत. इतकी वर्षे मनोरंजन सृष्टीत काम करणाऱ्या प्रसादला या वर्षात एक वेगळाच प्रकाश झोत उजळून गेला. या प्रकाशाने त्याला एक वेगळीच झळाळी दिली आणि म्हणून २०२२ हे वर्ष प्रसाद ओकसाठी कधीही न विसरण्यासारखे ठरले. या वर्षातील प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या चित्रपटाचे त्याला एक उत्तम दिग्दर्शक सिद्ध केले. तर धर्मवीर या चित्रपटाने एक उत्तम नट म्हणून सिद्ध केले. अलीकडेच या धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीदेखील याच वर्षात घोषणा झाली आहे.
Discussion about this post