हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सलमान खान अर्थात प्रेक्षकांचा लाडका भाईजान व त्याची अल्विरा बालवीर सध्या कायदेशीर अडचणीत आले आहेत. सलमानचे फॅन्स त्याच्या दातृत्वाचे तोंडभरून कौतुक करत असतात. मात्र आज त्याच्याविरुद्ध चंदीगड पोलिसांत चक्क फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे. होय. अभिनेता सलमान खान व त्याची बहीण अल्विरा यांच्याविरोधात चंदीगडस्थित व्यावसायिक अरुण गुप्ता यांच्याकडून फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे.
सविस्तर सांगायचे झालेच तर, गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनुसार सलमान खानच्या हक्कात असणारी बिईंग ह्युमन या कपडे व इतर वस्तूविक्री करणाऱ्या कंपनीसोबत त्यांनी करार केला होता. यानुसार गुप्ता यांनी तब्बल ३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ते चंदीगड येथे बिईंग ह्युमनचे एक भव्य शोरूम उभारले होते. त्यात या कंपनीचे दागिने विकले जाणार होते. मात्र गुप्ता यांनी केलेल्या दाव्यानुसार, शोरूम उघडल्यानंतरही त्यांना कोणताही माल कंपनीतर्फे देण्यात आलेला नाही. यामुळे शोरूम बंद अवस्थेत पडले. याबाबत त्यांनी स्वतः सलमान खान व बिईंग ह्युमनचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बिईंग ह्युमनच्या दागिने विक्री करणाऱ्या सहाय्यक कंपनीच्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर ती वेबसाईट बंद पडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या घटनेला १.५ वर्ष उलटूनही सलमान खान व बिईंग ह्युमन यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने पोलिसांमध्ये गुप्ता यांनी तक्रार केली असल्याचे सांगितले. पुरावा म्हणून त्यांनी कंपनीसोबत केलेल्या लिखित कराराची कॉपी देखील जोडली आहे. या व्यवहारात त्यांनी गुंतवलेले पैसे त्यांना परत मिळावे, अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे. या व्यापाऱ्याच्या तक्रारीची दखल घेत, चंदीगड पोलिसांनी सलमानसह त्याच्या कुटुंबियांना समन्स बजावले आहे आणि १० दिवसांत आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सलमान खान, अलवीरा खान, बीइंग ह्युमन कंपनीचा सीईओ प्रसाद कपारे, संतोष श्रीवास्तव, संध्या, अनुप, संजय मानव व आलोक यांना समन्स बजावला आहे.
Discussion about this post