हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या का केली? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. त्यातच आता या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. सुशांतने आत्महत्याच केली, असे मुंबई पोलिसांनी कधीच जाहिर केले होते. मात्र सुशांतचे कुटुंबीय, त्याचे चाहते आणि आता बिहार पोलिस हे मानायला तयार नाहीत. बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एका बड्या अधिकाऱ्याने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
सुशांत आत्महत्येच्या आठवडाभरापूर्वी सतत तीन गोष्टी गुगलवर सर्च करत होता, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे. या तीन गोष्टी म्हणजे स्वत:चे नाव, त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियानचे नाव आणि स्वत:चा आजार.
इंडियन एक्स्प्रेसने या अधिका-याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, 14 जून म्हणजेच ज्या दिवशी सुशांतने आत्महत्या केली, त्या दिवशीही त्याने गुगलवर स्वत:चे नाव सर्च केले होते. अधिका-याने केलेल्या दाव्यानुसार, सुशांतचा मोबाईल आणि लॅपटॉपच्या फॉरेन्सिक रिपोर्टमधून ही बाब स्पष्ट झाली आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत 40 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत तीन मानसोपचार तज्ज्ञांचा जबाबही नोंदवला आहे.