हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय मालिका ‘प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची’ ही तृतीयपंथी आई आणि तिची मुलगी यांच्या नाजूक नात्यावर भाष्य करणारी मालिका आहे. यात सस्पेन्स आहे, थ्रिल आहे आणि भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या मालिकेला रंजक बनवतात. ममता आणि दिशा यांना त्यांच्या भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे मालिकेतून पहायला मिळते. कथानक अतिशय वेगळे असल्यामुळे प्रेक्षकही मालिकेला भरभरून प्रेम देत आहेत. या मालिकेतील कलाकरांनी नुकतीच ‘द ट्रान्स कॅफे’ आणि ‘ट्विट फाउंडेशन’मधील तृतीयपंथीयांची भेट घेतली आहे.
या मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा ममता, दिशा आणि शन्नोबी यांनी अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने जागतिक मातृदिन साजरा करण्यासाठी वर्सोवातील ‘द ट्रान्स कॅफे’ आणि गोरेगावमधील ‘ट्विट फाउंडेशन’मधील तृतीयपंथी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. इतकेच नव्हे तर उपजीविकेसाठी प्रयत्न करत असताना त्यांना येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला. यावेळी मालिकेतील तृतीयपंथी आईची भूमिका साकारत असलेली ‘ममता’ म्हणजेच अभिनेता अमोल बावडेकर आणि मुलगी ‘दिशा’ म्हणजेच अभिनेत्री पायल मेमाणे आणि ममताची मैत्रीण ‘शन्नोबी’ हे कलाकार उपस्थित होते. त्यांची भेट निष्ठा निशांत यांच्याशी झाली. ज्या एक तृतीयपंथी वैज्ञानिक संशोधक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्यांचे ट्रान्सजेंडर वेल्फेअर इक्विटी अँड एम्पॉवरमेंट ट्रस्ट (ट्विट फाउंडेशन) हे तृतीयपंथी व्यक्तींद्वारे समुदायाला निवारा, शिक्षण, रोजगार, समुपदेशन आणि समर्थन प्रदान करण्यासाठी कार्यरत आहे.
ट्रान्स कॅफे हा ‘ट्रान्सवुमन’द्वारे व्यवस्थापित केलेला व्यवसाय आहे. ज्याद्वारे शहरातील ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी सामाजिक समर्थन अन नोकरीच्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेत. मालिकेतील ममताची कहाणी आणि निष्ठा तसेच तृतीयपंथी समुदायातील इतर अनेकांच्या जीवनाशी साम्य साधते. जगण्यातील अडचणी, अस्तित्वासाठी लढणे, आर्थिक स्वावलंबनाचा खडतर प्रवास, डोंगराएव्हढी आव्हाने आणि सामाजिक प्रतिक्रिया यांच्यासोबन्त झगडताना त्यांना पाठबळ देण्याचे अक्म या संस्था करतात. त्यामुळे अतिशय अभिमानाने ‘प्रतिशोध झुंज अस्तित्वाची’ या मालिकेतील ममता, दिशा आणि शन्नोबी यांनी सन्मानाने उपजीविकेसाठी प्रयत्न करणाऱ्या, तृतीयपंथींबरोबर ‘मदर्स डे’ साजरा केला. यावेळी निष्ठा निशांत यांची भेट ही ममताला प्रेरणा देऊन गेली अन काही क्षणात मोठमोठे धडे देऊन गेली.
Discussion about this post