हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच ‘ललिता शिवाजी बाबर’ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे पोस्टर प्रजासत्ताक दिनादिवशी प्रदर्शित झाले. यानंतर एका माध्यमाच्या कार्यक्रमादरम्यान ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाचा टिझर लॉन्च झाला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शिवाय ललिता शिवाजी बाबर स्वतः आणि अमृता खानविलकर, प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर, एंडेमॉल शाईन इंडियाचे गौरव गोखलेदेखील येथे उपस्थित होते. दरम्यान ललिता यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि यानंतर अमृताने एक पोस्ट शेअर केली आहे.
या सोहळ्यात बोलताना ललिता शिवाजी बाबर म्हणाल्या, ‘कठीण प्रसंगांचा सामना करून मी आज इथे पोहोचले आहे. आज माझा इथे सन्मान झाला, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. मी अमृता खानविलकर यांच्यासह सगळ्यांचेच खूप आभार मानते.’ या सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अमृताने लिहिले, ‘ललिता ताई ह्यांचा हा फोटो माझ्या साठी खूप खास आहे. या कार्यक्रमातून आम्हाला “ललिता शिवाजी बाबर ” ह्याची एक छोटीशी झलक मा. मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे ह्यांना दाखवायला मिळाली. ज्या क्षणी ताईंना बोलण्यासाठी माइक दिला गेला त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आम्हाला सगळ्यांनाच थक करून गेले’.
ताईंचा साधेपणा … त्यांचं बोलणं मनाला भिडलं … काही वाक्यांमधूनच कळत होतं कि त्या किती आतुरतेने या दिवसाची वाट बघत होत्या.’ यापुढे अमृताने या क्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कार्यक्रमाचे सदारकर्ते यांचे आभार मानले आहेत. सोबत म्हणाली कि, ‘प्रवास नुकताच सुरु झालाय …. अजून खूप चालायचय … नाही पळायचंय’. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषी नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘ललिता शिवाजी बाबर’ हा चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Discussion about this post