हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आयुष्यभर झटत, कलाभूमीची सेवा करत आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत हे कलाकार आपले आयुष्य कधी वाहून जातात कळतंच नाही. त्यांची कारकीर्द जणू एखादा प्रवाह असतो. ज्यामध्ये वाहणारे हे कलाकार संथ गतीने आपल्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत असतात. अशीच एक बहुरूपी कलाकार म्हणजे अभिनेत्री श्रेया बुगडे. नुकताच तिला यंदाचा १२ वा लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार तिला वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्काराची मानकरी श्रेया बुगडेने सोशल मीडियावर या सन्मानाचा आनंद व्यक्त केला आहे. सोबत या सोहळ्यातील खास क्षण देखील फोटो स्वरूपात शेअर केले आहेत.
अभिनेत्री श्रेया बुगडेने हि पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘काही काही क्षण मी कलाकार आणि माणूस म्हणून खूप नशीबवान असल्याची जाणीव करून देतात.. हा त्यापैकीं एक.. ह्या वर्षीचा १२’वा लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार 2022’ – ‘नवोन्मेष प्रतिभा’ हा पुरस्कार मिळाला..
लोकशाहीर विठ्ठल उमप यांसारख्या थोर कलाकाराच्या नावाने असलेल्या पुरस्काराबरोबर माझं नाव जोडलं गेलं, ज्याचा आनंद शब्दात मांडता येणार नाही! व्यासपीठावर जे माझे सह पुरस्कर्ते होते त्यांच्याबरोबर उभंसुद्धा राहण्यास मी स्वतःला पात्र समजत नाही… पण नंदेश दादा, सरिता वहिनी तुमचे खूप आभार… इतकं प्रेम आणि सन्मान दिल्याबद्दल..’ यासोबत तिने ‘ह्या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांचे आहे.. लोभ आहेच, तो वृद्धिगंत व्हावा !!’ असेही आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.’
या सोहळ्यात श्रेया व्यतिरिक्त अन्य काही दिग्गज व्यक्तींचादेखील सन्मान करण्यात आला. यामध्ये फ. मुं.शिंदे यांना जीवनगौरव प्रदान करण्यात आला. तर पद्मश्री डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे याना सामाजिक क्षेत्र या विभागासाठी गौरविण्यात आले. याशिवाय अभिनेता संजय मोने आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सुकन्या मोने याना अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीसाठी सन्मानित करण्यात आले. तसेच रवींद्र साठे याना संगीत कलाक्षेत्रातील कारकिर्दीसाठी आणि कमलाबाई शिंदे यांना लोककलेचा वारसा पुढे नेण्यासाठी गौरविण्यात आले.
Discussion about this post