हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व आहे. यामुळे सर्वत्र शांततेचे, अध्यात्माचे आणि सात्विक पावित्र्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्र हा उत्सव स्त्री शक्तीच्या स्वरुपांची पूजा करण्यासाठी विशेष काळ मानला जातो. या निमित्ताने शक्तीची नानाविध रूप साकारून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आपल्या चाहत्यांना आईच्या मूळ आणि विविध स्वरूपाचे दर्शन देण्यास पुढारली आहे. तिने केलेल्या या फोटोशूटच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या शक्तिपीठांची रूपे ती चाहते आणि भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देताना दिसत आहे.
आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे आणि आजच्या दिवशी तिने कार्ल्याची आई रेणुका मातेचे स्वरूप धारण केले आहे. या देवीला परशुरामाची आई म्हणून देखील ओळखले जाते. यामागे एक मोठी आख्यायिका आहे. या पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवास काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असता त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वर तिने पांडवांना दिला. एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.
हा फोटो शेअर करताना अपूर्वाने कॅप्शनमध्ये लिहिले कि, नवरात्रीचा सहावा दिवस! रंग – लाल. देवी-एकवीरा देवी. लोणावळ्याजवळील वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते. मी अणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!.
याआधी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अपूर्वाने कोल्हापूर, करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीचे स्वरूप धारण केलेले फोटो शेअर केले होते. यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिने मुंबापुरीची ग्रामदेवता मुंबादेवीचे स्वरूप धारण केलेले फोटो शेअर केले होते. तर तिसऱ्या दिवशी तिने कर्नाटक उडपी येथील दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केलेले फोटोशूट शेअर केले होते आणि चौथ्या दिवशी राशीनची यमाई माताचे रूप धारण केलेले फोटोशूट तिने शेअर केले आहे. पुढे पाचव्या दिवशी बंगाली देवीचे स्वरूप धारण केलेले फोटोशूट शेअर केले होते. तिच्या या फोटोशूटला प्रचंड पसंती मिळत असून अनेकांनी तिच्या फोटोंमधून देवी आईचे दर्शन घडल्याचे म्हणत तिचे व तिच्या टीमचे कौतुक केले आहे.
Discussion about this post