Adipurush Review : भारत ही ऐतिहासिक चित्रपटांची मोठी बाजारपेठ आहे. इथे बनणारे ऐतिहासिक चित्रपट हे भव्यदिव्य आणि डोळ्यांचं पारणं फेडणारे असतात. रामायण, महाभारत, श्रीकृष्ण यांसारख्या मालिका वर्षानुवर्षे नागरिकांचं मनोरंजन करत आल्या. कोरोना काळात लॉकडाऊन पडल्यानंतरही या मालिका पुन्हा दाखवण्यात आल्या. शालेय जीवनात पहिली-दुसरीतच रामायण-महाभारताच्या सुरस कथा वाचलेली कोट्यवधी मंडळी देशात आहेत.
२००५ नंतर ऍनिमेशन पटांतूनही रामायण-महाभारत लोकांसमोर आणलं गेलं. असं असताना आज तेच रामायण-महाभारत वेगळ्या पद्धतीने लोकांना दाखवलं तर ते रुचेल का? सीतेला जिंकण्यासाठी रावणाबरोबर युद्ध करायचं ही स्क्रिप्ट फायनल असेल तर मग युद्ध वेगळ्या पद्धतीने कसं दाखवता येईल? या सगळ्या गोष्टींचा विचार करून दिग्दर्शक ओम राऊत यांनी कल्पकतेने आदिपुरुष हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे. स्पायडरमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन, एवेंजर्स या सुपरहिरोंचे चिक्कार सिनेमे पाहिलेल्या नव्या पिढीला भारतीय इतिहासातील राम, हनुमान हे सुपरहिरो यानिमित्ताने पहायला मिळणार आहेत. Adipurush Review
आदिपुरुष चित्रपटाचं पहिलं पोस्टर आणि टीजर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी त्याची खिल्ली उडवली होती. अलंकारिक कपड्यांतील राम-रावण पहायची सवय झालेल्या लोकांना सिक्स पॅक असलेला राम किंवा रावण, ग्रास कट मारलेला, दाढी राखलेला रावण, त्याचं खतरुड तोंडाचं वटवाघूळ हे वाहन रुचणं शक्यच नव्हतं. (Adipurush Movie REVIEW) तरीही सिनेमॅटिक लिबर्टी वापरून मी या गोष्टी केल्याचं ओम राऊत यांनी स्पष्ट केलं. महर्षी वाल्मिकी, संत तुलसीदास आणि अनेकांनी रामायण लिहिलं. हा चित्रपट त्यांच्या साहित्याचा आधार घेऊन बनवला असला तरी त्यात नाट्य रूपांतरण करताना बऱ्याच गोष्टी काल्पनिक दाखवल्या असल्याची कबुली दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सुरुवातीलाच दिली आहे. चित्रपट म्हणजे खरं रामायण नाही असा संदेशही चित्रपट सुरू होण्याआधीच दिला आहे.
असं असताना चित्रपट सुरू झाल्यापासूनच तुम्ही लॉजिकच्या गोष्टी डोक्यातून बाजूला ठेवून निव्वळ मनोरंजन म्हणून चित्रपट पहायला सुरू करू शकता. बाहुबली चित्रपटामुळे घराघरांत पोहचलेल्या प्रभासने राघव म्हणजेच प्रभू श्रीरामाची भूमिका मस्त साकारली आहे. प्रभू श्रीरामाची आतापर्यंत कल्पिलेल्या शांत, संयमी, धीरोदात्त प्रतिमेला बदलण्याचा प्रयत्न या चित्रपटात केलेला नाही. प्रभासचे प्रसंगानुसार चेहऱ्यावरील हावभाव रामाच्या भूमिकेला न्याय देतात. आदिपुरुष या चित्रपटाच्या नावाला साजेशी भूमिका प्रभासच्या वाट्याला आली आहे. प्रसंगानुरूप त्याच्या तोंडून जे संदेश दिले जातात ते आवर्जून नोंदवण्यासारखे आहेत. रावणाच्या भूमिकेत मात्र इतर चित्रपट-मालिकांपेक्षा टोकाचा बदल या चित्रपटात दिसतो. आक्रस्ताळेपणाचा कळस अशी सैफ अली खानने साकारलेल्या रावणाची थोडक्यात ओळख सांगता येईल. (Adipurush REVIEW)
हनुमानाची भूमिका देवदत्त नागे या मराठमोळ्या कलाकाराने खुबीने साकारली आहे. लावण्यवती सीतेची भूमिका साकारलेल्या क्रिती सेनॉनच्या वाट्याला खूप कमी संवाद आले आहेत. तीन तासांच्या चित्रपटातील तिचा १०-१५ मिनिटांचा वावर हा प्रतिकात्मकच वाटतो. बाकी लक्ष्मण, बिभीषण, सुग्रीव यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी बऱ्यापैकी केल्या आहेत. (Adipurush Movie REVIEW) व्हीएफएक्स तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आधुनिक काळातील रामायण पाहत असल्याचा फील सिनेरसिकांना येऊ शकतो. चित्रपटात दाखवण्यात आलेलं जंगल, नदी, समुद्र, पर्वतं, लंकेतील महाल, युद्धभूमी हे व्हीएफएक्स तंत्रज्ञानामुळे वेगळ्याच दुनियेतलं (मल्टिवर्स) वाटतं. चित्रपटात काही ठिकाणी केला गेलेला व्हीएफएक्सचा वापर अति वाटतो. नॉर्मल चालणारी माणसंही आखडून चालल्यागत वाटतात. रावणाच्या भूमिकेत तर हे सातत्याने दिसून येतं.
कथेच्या किंवा संवादाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यात वेगळेपण काहीच नाही. रामाला मर्यादापुरुषोत्तम का म्हटलं जायचं? एखाद्या राज्यातील स्त्रीवर किंवा प्रजेवर अन्याय झाल्यास राजाने काय करावं? याची चपखल उत्तरं देणारे २-४ झकास संवाद चित्रपटात आहेत. प्रभू श्रीरामाप्रति असलेली हनुमानाची भक्तीही नेमकेपणाने अधोरेखित केलेली आहे. याव्यतिरिक्त चित्रपटात विशेष म्हणावं असं काही नाही. जय श्रीरामचा उद्घोष चालू असलेलं बॅकग्राउंड म्युझिक तुम्हाला आनंद देईल. (Adipurush Movie REVIEW)
चित्रपटाच्या सुरुवातीचं रामायणासंदर्भातील निवेदन आणि त्याला लागून असलेलं मंगल भवन अमंगल हारी हे गाणंसुद्धा तुम्हाला जुन्या आठवणींत घेऊन जाईल. मात्र ते तेवढयापुरतंच. चित्रपटात राम, सीता, लक्ष्मण, हनुमान ही नावं न वापरता राघव, जानकी, शेष, बजरंग ही नावं वापरली आहेत. दर्शकांसाठी ही गोष्ट निश्चितच नवी असेल. रावण मरतो आणि बाकी मंडळी एकत्र येऊन चित्रपट संपतो असा चित्रपटाचा सपक शेवट केला आहे.
(Adipurush Review) नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. लगेच वीकेंड सुद्धा आहे. शाळकरी मुलांना बघून बरा वाटेल असा हा चित्रपट आहे. बाकी स्वतःला मोठ्या (प्रौढ) समजणाऱ्या लोकांना तीन तासांचं मनोरंजन किंवा टाईमपास करायचा असेल तर चित्रपट पहायला हरकत नाही.
Discussion about this post