हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहेत. या वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसविण्याची जबाबदारी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने घेतली आहे आणि ते अत्यंत उत्कृष्टरित्या आपली कामगिरी बजावत आहेत. पण तरीही कुठेतरी या वाहिनीवरील गाजलेला कॉमिक शो ‘फू बाई फू’ची कमी जाणवतेच. म्हणूनच तब्बल ९ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मेकर्सने फू बाई फू या कॉमिक शोचे नवे पर्व सुरु करण्याचे योजिले आणि आता प्रतीक्षा संपली आहे. कारण येत्या नोव्हेंबर महिन्यापासूनच हा शो सुरु होतो आहे.
झी मराठी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. मग प्रेक्षकांची इच्छा अशी कशी अपूर्ण ठेवणार…? म्हणून झी मराठीवर येत्या ३ नोव्हेंबर २०२२ पासून तब्बल ९ वर्षानंतर ‘फू बाई फू’ हास्यकल्लोळ पर्व सुरु होत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे एकूण १४ भाग प्रदर्शित झाले होते. यानंतर आता हा १५ वा भाग असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. कॉमेडीचा एक नवा हंगाम घेऊन ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम पुन्हा सुरु होत आहे हि बातमीच अत्यंत उल्हासदायी ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फू बाई फू’च्या या नव्या भागात कॉमेडीचे विविध कार्यक्रम गाजवलेले हरहुन्नरी हास्यवीर कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत. तसेच काही नवे कलाकार देखील या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार असून परिक्षणाची जबाबदारी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि उमेश कामत यांच्या खांद्यावर देण्यात आल्याचे समजत आहे. आता फू बाई फू परत येणार म्हणजे म्हणजे मराठी प्रेक्षक पोट धरुन लोटपोट होऊन हसणार यात शंकाच नाही. आता फक्त एकच उत्सुकता आहे कि, या कार्यक्रमात कोणकोण सहभागी होणार.?
Discussion about this post