हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या सप्टेंबर महिन्यात २१ तारखेला प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का अद्याप पूर्ण पचलेला नसताना आता आणखी अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. श्रीवास्तव यांच्या निधनाच्या दुःखातून चाहते सावरत नाहीत तोच आणखी एका स्टॅन्ड अप कॉमेडियनच्या निधनाची बातमी समोर आली आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पहिल्या सीजनमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आणि भरभरून मनोरंजन करणारे विनोदवीर पराग कंसारा यांचे निधन झाले आहे. याबाबत अधिकृत माहिती सुनील पाल यांनी दिली आहे.
पराग कंसारा यांचे मित्र आणि प्रसिद्ध विनोदवीर सुनील पाल यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत हि दुःखद वार्ता दिली आहे. यावेळी सुनील पाल अत्यंत भावुक झालेले दिसत होते. या व्हिडिओत सुनील पाल म्हणाले आहेत कि, ‘नमस्कार आणखी एक हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे आणि तीही कॉमेडी विश्वातून. ‘लाफ्टर चॅलेंज’ या शोमधील आमचे मित्र पराग कंसारा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ‘उलटा सोच’ असं म्हणत जे सगळ्यांना उलटा विचार करण्यास सांगून खळखळून हसवत होते तेच परत कंसारा आज आपल्यात नाहीत.’
पुढे म्हणाले आहेत कि, ‘आमच्या कॉमेडी इंडस्ट्रीला कोणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक. एक एक विनोदवीर आपल्याला सोडून जात आहेत. पराग अत्यंत उत्कृष्ट आणि मुरलेले कलाकार होते. त्यांच्या जाण्याचे आम्हाला अपार दुःख आहे.’ असे म्हणत सुनील पाल यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. पराग यांनी जादूचे शो तसेच सर्कसमध्ये काम करत स्वबळावर नाव कमावले होते. ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातही ते दिसले होते. पराग हे मूळ गुजरातचे असून ‘लाफ्टर चॅलेंज’ मधून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर त्यांनी हजारो स्टँडअप कॉमेडीचे लाईव्ह शो केले होते.
Discussion about this post